सांगली - महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत व शिक्षण घेत असतानाच पहिली ते बारावीपर्यंतच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाच्या "बालभारती'चे महत्त्वाचे स्थान आहे; मात्र याच बालभारती पुस्तकात लिहिणाऱ्या लेखकाला वार्षिक केवळ दोनशे रुपये मानधनावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे लेखकांसाठी हे मानधन की अपमानधन, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुवर्ण महोत्सवी बालभारतीचा प्रवास "बोलक्या पुस्तकांच्या' निर्मितीपर्यंत पोचला आहे. दर वर्षी बालभारती सात कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई करते. 450 पाठ्यपुस्तकांची निर्मितीही दर वर्षी केली जाते. यंदा सहावीची पाठ्यपुस्तके बदलली आहेत. यंदाच्या अभ्यासक्रमात नव्या दमाच्या साहित्यिकांना संधी मिळाली. सांगली जिल्ह्यातील आमणापूरचे संदीप नाझरे हे त्यापैकीच. त्यांचा "पण थोडा उशीर झाला' हा सैनिकाच्या जीवनावरील हृदयस्पर्शी धडा लोकप्रिय झाला. त्यांनी बालभारतीकडून लेखकांना मिळणाऱ्या अल्पशा मानधनाबद्दल माहिती दिली. बालभारतीकडून एका पाठासाठी लेखकांना प्रतिवर्षी 200 रुपये मानधन दिले जाते, असे त्यांनी सांगितले. एकीकडे पाठ शिकविणाऱ्या शिक्षकाला दिवसाचे वेतन किमान हजार रुपये मिळत असताना पाठ लिहिणाऱ्याला मात्र अवघ्या दोनशे रुपयांवर समाधान मानावे लागते, ही दुर्दैवी बाब आहे.
हे मानधन जुन्या निकषांनुसार असेल, तर महागाईत ते कालबाह्य का ठरवले गेले नाही. मानधन वाढीबाबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने निर्णय घ्यायला हवा.
- संदीप नाझरे, लेखक, बालभारती, आमणापूर, ता. पलूस
|