बेळगाव : केंद्र शासनाच्या स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंजची(Clean Technology Challenge) अंमलबजावणी बेळगाव महापालिकेने सुरू केली आहे. शहरातील कचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठीचे नवे तांत्रीक प्रयोग(Technical experiment) करणाऱ्यांकडून महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. शहर स्वच्छतेसाठी नागरीकांचा सहभाग, रस्त्यावर कचरा टाकण्यावर शंभर टक्के निर्बंध (झिरो डंपींग), प्लास्टीक कचरा व्यवस्थापन व पारदर्शकता या चार प्रकारांमध्ये हे प्रयोग राबवावे लागणार आहेत. यासाठी व्यक्ती, विविध स्टार्ट अप, कंपनी किंवा शिक्षण संस्थांनी प्रस्ताव द्यावेत असे आवाहनही महापालिकेने केले आहे. बेळगाव महापालिकेकडे दाखल होणाऱ्या प्रस्तावांपैकी दोन उत्कृष्ट प्रस्ताव केंद्रीय नगरविकास खात्याकडे पाठविले जाणार आहेत.
राज्य व देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट प्रस्तावांना रोख पारीतोषीक दिले जाणार आहे. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने पुरस्कारासाठी निवडलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रशासनाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय त्याना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकनही दिले जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र शासनाने ही नवी योजना सुरू केली आहे. शहराच्या स्वच्छतेच्या कामात व्यक्ती, संस्था किंवा विद्यार्थी यांचा सहभाग वाढविणे हा त्यामागचा उद्देश आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शहर स्वच्छतेचे काम अधिक सुलभपणे होवू शकते.
प्लास्टीकच्या वाढत्या समस्येवरही तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरू शकतो, शिवाय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या कामात पारदर्शकता येवू शकते असे नगरविकास खात्याला वाटते. त्यासाठीच देशभरात ही स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज योजना राबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. बेळगाव महापालिकेने त्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी आपले प्रस्ताव महापालिकेकडे पाठविणे आवश्यक आहे.
स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून देशातील शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. पण त्यात नागरीकांचा सहभाग अद्यापही कमी आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून नागरीकांचा सहभाग वाढविता येतो का? याची याचपणी या चॅलेंजच्या माध्यमातून केली जाणार आहे. प्रत्येक महापालिकेकडून दाखल केल्या जाणाऱ्या कमाल दोन प्रस्तावांची राज्यस्तरावरही छाननी केली जाणार आहे. राज्यातून ३ प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले जाणार आहेत.
जानेवारी महिन्यात याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रत्येक राज्यातील तीन प्रस्तावांना रोख पारीतोषीक दिले जाणार आहे. अडीच लाख, दीड लाख व एक लाख अशी पारीतोषिकाची रक्कम आहे. गेल्या दोन वर्षात अनेक स्टार्ट अप सुरू झाले आहेत. त्याना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. बेळगावातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये नवे प्रयोग राबविले जातात. त्याना आता शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने नवा प्रयोग राबवावा लागेल व त्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवावा लागेल. व्यक्तीगत स्तरावरही एखादा प्रयोग राबविला असेल तर तोही पालिकेकडे पाठविण्याची मुभा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.