महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपला (BJP) मिळाल्यानंतर नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.
बेळगाव : बेळगावच्या महापौरपदी (Belgaum Mayor) भाजपच्या सविता कांबळे (Savita Kamble) यांची गुरुवारी (ता. १५) बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीतही भाजपच्या आनंद चव्हाण यांनी बाजी मारली. चव्हाण यांना ३९ तर काँग्रेसच्या (Congress) उमेदवार ज्योती कडोलकर यांना २० मते मिळाली. प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.
महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपला (BJP) मिळाल्यानंतर नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. बेळगावचे महापौरपद यावेळी अनुसूचित जातीच्या (Scheduled Caste) महिलेसाठी राखीव होते. विरोधी गटाकडे या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने महापौर निवडणूक बिनविरोध होणार, हे आधीच निश्चित झाले होते. मात्र, महापौरपदासाठी सत्ताधारी गटातच मोठी चुरस झाली.
भाजपच्या नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनीही अखेरच्या क्षणापर्यंत महापौरपदासाठी प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. महापौरपदासाठी सविता कांबळे व लक्ष्मी राठोड यांच्याकडून प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. राठोड यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे कांबळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे कांबळे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा प्रादेशिक आयुक्त शेट्टन्नावर यांनी केली. उपमहापौरपदासाठी आनंद चव्हाण यांचेच नाव आधीपासून चर्चेत होते. विरोधी गटाकडून उपमहापौरपदाची निवडणूक लढविली जाणार की नाही? याबाबत उत्सुकता होती.
गुरुवारी सकाळी यासंदर्भात विरोधी गटाची बैठक गटनेते मुजम्मील डोणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत उपमहापौरपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्यासोबत मोबाईल फोनवरून चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर विरोधी गटाकडून उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या ज्योती कडोलकर यांचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटाकडून आनंद चव्हाण व माधवी राघोचे या दोघांनी अर्ज दाखल केले होते.
तर विरोधी गटाकडून ज्योती कडोलकर व शहामोबीन पठाण यांनी अर्ज दाखल केले होते. राघोचे व पठाण यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे चव्हाण व कडोलकर यांच्यात लढत झाली. यात भाजपचे चव्हाण यांना ३९ मते मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. महापौरपद कन्नड भाषिकांना तर उपमहापौरपद मराठी भाषिकाला देत सत्ताधारी भाजपने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी किंवा विरोधी गटाकडून कोणत्याही नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली नाही.
महापौरपदासाठी ४ तर उपमहापौरपदासाठी ६ अर्ज दाखल झाले होते. दुपारी १ वाजता प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यावेळी पडताळणीत सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली. महापौर निवडणुकीत ६५ पैकी ५९ सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व ५८ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. पदसिद्ध सदस्यांपैकी खासदार मंगला अंगडी व आमदार अभय पाटील या दोघांनीच निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. विधिमंडळ अधिवेशनामुळे पदसिद्ध सदस्य जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार राजू सेठ अनुपस्थित राहिले. भाजपचे विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार हेही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत.
महापौर निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या नेत्यांची मांदियाळी महापालिकेत पहायवयास मिळाली. माजी मंत्री मुरुगेश निराणी, खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, भाजपचे प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली, भाजपच्या महानगर अध्यक्षा गीता सुतार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले.
नूतन महापौर सविता कांबळे या सामान्य कुटुंबातील असून सदाशिवनगर परिसरातून महापालिकेवर निवडून गेल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्यांनी काही काळ कंत्राटी तत्वावर पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावली आहे. कांबळे यांनी दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे घेतले आहेत. त्यांनी शहरातील उद्यमबाग परिसरातील एका अगरबत्ती व हेल्मेट निर्मिती कंपनीत नोकरी केली आहे. २०२१ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभागातील नागरिकांनी त्यांना निवडणूक लढविण्यास प्रवृत्त करुन निवडून आणले. आता बेळगावच्या प्रथम नागरीक होण्याची संधी त्यांना मिळाली आहे. उपमहापौर आनंद चव्हाण यांची क्रिकेट खेळाडू व टिळकवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. २०२१ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत टिळकवाडी भागातून भाजपच्या उमेदवारीवर ते महापालिकेवर निवडून गेले.
-महापालिकेच्या २२ व्या कार्यकाळासाठी महापौर व उपमहापौरांची निवड
-६५ पैकी ५९ सदस्यांनी घेतला निवडणूक प्रक्रियेत सहभाग
-२०११ नंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना सभागृहातून वार्तांकनाची मिळाली संधी
-सलग दुसऱ्या वर्षी भाजपने महापालिकेतील सत्ता राखली; ऑपरेशन हस्तच्या चर्चेला विराम
-आमदार अभय पाटील यांची सत्ताधारी गटावरील पकड कायम
-विरोधी गटातील नगरसेवकांचीही एकजूट कायम
महापालिकेची सदस्य संख्या : ६५
महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाग घेतलेल्यांची संख्या : ५९
सत्ताधारी गटासोबत राहिलेल्या सदस्यांची संख्या : ३९
विरोधी गटासोबत राहिलेल्या सदस्यांची संख्या : २०
नूतन महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ : १२ महिने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.