खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपअंतर्गत धुसफूस सुरू होती. गेल्या वर्षभरापासून पक्षातील काही प्रमुख मंडळींनी त्यांच्याविषयी वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या.
सांगली : पक्षांतर्गत विरोधावर मात करत खासदार संजयकाका पाटील (SanjayKaka Patil) यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी राखली. भाजपच्या (BJP) केंद्रीय समितीकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. त्यात संजयकाकांचे नाव जाहीर होताच त्यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपअंतर्गत धुसफूस सुरू होती. गेल्या वर्षभरापासून पक्षातील काही प्रमुख मंडळींनी त्यांच्याविषयी वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्याऐवजी काही नावांची शिफारस करण्यात आली होती. सातत्याने पर्याय सुचवले जात होते. विविध सर्वेक्षणाचे दाखले दिले जात होते. त्या सगळ्यावर मात करत त्यांनी आपली उमेदवारी राखली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी असलेला थेट कनेक्ट आणि पक्षांतर्गत नाराजांच्या मनातील शंका दूर करण्यात त्यांना यश आल्याचे मानले जात आहे. ज्यांनी विरोध केला त्यांची समजून काढण्यात त्यांना यश आले आहे. सन २०१४ आणि २०१९ ला एकतर्फी विजय मिळवत दिल्ली गाठलेल्या संजयकाकांना यावेळी हॅट्ट्रिकची संधी असणार आहे. त्यासाठी त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विशाल पाटील असतील की शिवसेना (ठाकरे) पक्षातून चंद्रहार पाटील याची उत्सुकता असेल.
तासगावचे माजी आमदार दिनकरआबा पाटील यांचे पुतणे असलेले संजयकाका सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते. युवक काँग्रेसपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. सांगलीतील राजकारणात सातत्याने वादाचे प्रसंग उद्धवत असल्याने त्यांना तासगावच्या मैदानात उतरवण्यात आले. तेथे त्यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांना कडवी लढत देत सातत्याने आव्हान उभे केले.
एका टप्प्यावर काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवली. तेथे आबांशी पटले नाही आणि राजकीय वारे बदलत असताना सन २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत सांगली लोकसभेची उमेदवारी मिळवली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पक्षांतर्गत विरोध डावलून त्यांना उमेदवारी दिली. तोवर सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो उद्ध्वस्त करत संजयकाकांनी अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
सन २०१९ ला त्यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत विरोधकांनी रान उठवले होते. ते वादळ शांत करून त्यांनी उमेदवारी मिळवली आणि दीड लाख मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा दिल्ली गाठली. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. आता ते पुन्हा सांगलीतून लढण्यासाठी सज्ज असून, उमेदवारी जाहीर होताच त्यांनी हॅट्ट्रिकचा विश्वास व्यक्त केला आहे.
गेली दहा वर्षे खासदारकीच्या माध्यमातून लोकसेवा करतोय. विस्तारित सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्गांचा विकास, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण अशा पायाभूत सुविधांसह सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक केली. लोकांसाठी २४ तास उपलब्ध राहिल्याने पुन्हा एकदा लोकसभा लढण्याची संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
-संजय पाटील, खासदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.