भाजप ‘रिचार्ज’; दोन्ही काँग्रेस सावध पवित्र्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण लाड यांनीही पदवीधर मतदार संघातून आमदारकी मिळाली.
sangli
sangliesakal
Updated on

पलूस : राज्यात सत्तांतरानंतर भाजप चांगलाच ‘रिचार्ज’ झाला आहे. सत्तावंचित काँग्रेस व राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी-युतीचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. आधीच तोळमासा ताकद असलेल्या शिवसेनेत दुफळी पडली असून दोन गटांनी नवी सोयरीक मांडून संसार सुरू केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी विकासकामांचा सपाटा लावला होता. जवळपास २९८ कोटींचा विकासनिधी त्यांनी मंजूर करून आणला. आमदार मोहनराव कदम यांनी सुद्धा तालुक्यात मोठा विकासनिधी आणला. एकूणच, काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उत्साहात होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण लाड यांनीही पदवीधर मतदार संघातून आमदारकी मिळाली. त्यांनीही पलूस तालुक्यातील विकासासाठी निधी उपलब्ध करून आणला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुक्यात उत्साहाचे नवे वारे वाहत होते. दुसरीकडे, सत्तेविना भाजपमध्ये मरगळ आली होती. भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख त्यातूनही सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते.

अचानक राज्यात सत्तांतर झाले. भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदारांची सत्ता आली. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. विश्‍वजित कदम यांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे चित्र आहे. श्री. कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन, मंत्री नसलो तरी विकासकामांमध्ये खंड पडणार नाही, अशी ग्वाही दिली. सर्व पक्षांतील नेत्यांबरोबर आपले चांगले संबंध असून आपली कामे होतच राहतील, अशी ग्वाही दिली.

पलूस तालुक्यात जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनीही संपर्क वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सत्ताबदलानंतर काहीशी नाराजी पसरली. मात्र, आमदार अरुण लाड, शरद लाड यांनी प्रत्येक गावात संपर्क मोहीम राबवून पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सत्तांतरानंतर शिवसेनेच्या जिल्हा युवासेनेचे अध्यक्ष विनायक गोंदील ठाकरेंसोबत, तर तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पलूस नगरपालिका निवडणूक भाजप स्वतंत्रपणेच लढवेल, असा अंदाज आहे; तर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येणार की, स्वतंत्र लढणार, हे चित्र अस्पष्ट आहे.

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपची युती होती. यात कुंडल गटातून शरद लाड भाजपच्या मदतीने विजयी झाले होते, तर उर्वरित तीन ठिकाणी भाजपने जागा घेत तीनही जिंकल्या होत्या. पाच वर्षात आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

कदम आणि लाड यांच्यात मैत्रीसंबंध तयार झाले आहेत. अरुण लाड यांना पदवीधर मतदारसंघातून कदम यांनी बळ दिले होते. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत किरण लाड यांचा पराभव झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात नाराजी आहे.

दोन्ही काँग्रेसमध्ये युतीचा निर्णय नेते जयंत पाटील यांच्याकडेच असेल.

बलाबल

जिल्हा परिषद : भाजप-३ राष्ट्रवादी-१, काँग्रेस-०

पंचायत समिती ः भाजप-४, राष्ट्रवादी-२, काँग्रेस-२

सभापती भाजप, उपसभापती-राष्ट्रवादी

नगरपालिका ः काँग्रेस-१२, भाजप-१, राष्ट्रवादी-०, स्वाभिमानी विकास आघाडी-४

- शिवसेनेची शकले - निवडणुकांची समीकरणे अद्याप गुलदस्त्‍यातच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.