महापौर बदलाचे आव्हान काँग्रेस स्वीकारेल?

महापौर बदलाचे आव्हान काँग्रेस स्वीकारेल?
Updated on

महापौर हारुण शिकलगार यांना दिलेली दहा महिन्यांची टर्म संपलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवा महापौर निवडण्यात यावा, अशी मागणी काल गुरुवारी नेत्या जयश्री पाटील यांच्याकडे काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी केली. सभागृहात काँग्रेसमधील उपमहापौर गटाचा एकूण पवित्रा पाहता महापौर बदलाचा निर्णय घेणे हे धाडसाचेच ठरेल. कारण श्रीमती पाटील महापौरांचा राजीनामा घेऊ शकतात; मात्र स्वतः ठरवू तो नवा महापौर निवडून आणण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीचीच मदत घ्यावी लागेल. स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दाखवलेला ठेंगा पाहता नेत्या पाटील हे आव्हान कितपत खेळतील? त्याच वेळी कोणत्याही क्षणी उपमहापौरच राजीनामा देऊन त्यांच्यापुढच्या अडचणी वाढवू शकतात.

गेल्या ६ फेब्रुवारीला विद्यमान महापौरांनी पदभार स्वीकारून वर्ष पूर्ण झाले. महापौर निवडीवेळी  शेखर माने यांनी स्वतःच्या गटाच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांना जेरीस आणताना शेवटच्या क्षणी उपमहापौरपदावर तडजोड करीत एका पाऊल मागे घेतले. त्यावेळी काँग्रेस पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या नगरसेवकाच्या मतदानात त्यांची सरशी झाली होती; मात्र नेत्यांच्या दबावापुढे  त्यांना माघार घ्यावी लागली आणि शिकलगार यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यांची निवड करताना सुरेश आवटी यांची महापौरपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र शिकलगार यांच्या पारड्यात नेत्या पाटील यांनी  वजन टाकले. त्यावेळी नेते पतंगराव कदम यांच्या बंगल्यावर झालेल्या चर्चेत तीस महिन्यांत तीन म्हणजे प्रत्येकी दहा महिन्यांसाठी एकास संधी द्यायचा निर्णय झाला होता. आता ही सारीच समीकरणे बदलली आहेत. 

पंधरा नगरसेवकांचा काँग्रेसमधील गट शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात काम करीत असतो. त्यांच्यासोबत स्वाभिमानी आघाडीचे अर्धा डझन नगरसेवक आहेत. विधान परिषद निवडणुकीनंतर मानेंना बंडखोरीबद्दल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे वीसभर नगरसेवकांना विचारात घेऊनच काँग्रेसला पुढचा महापौर पदाचा निर्णय करावा लागेल किंवा त्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊनच निर्णय करावा लागेल. 

सभागृहात उपमहापौर गट व स्वाभिमानीचा एकूणच  पवित्रा विरोधकाचा असतो. त्यांनी स्वपक्षातील अनेक भानगडींना चाप लावला हे मान्यच करायला हवे. मात्र त्याचवेळी त्यांना सत्ता मिळाली तर नको आहे असे मात्र नाही. आता या वेळी ते उपमहापौरपदावर समाधान मानतील असे मात्र नाही. उलट ते महिनाभरात उपमहापौर विजय घाडगे यांचा राजीनामा घेऊन थेट विरोधकाच्या भूमिकेत जायच्या पवित्र्यात आहेत. काँग्रेसची झाकली मूठ कायम ठेवायचीच असेल तर या गटाला महापौरपदी संधी द्यावी लागेल. त्यातून आणखी एकाला संधी यापलीकडे नेत्यांना काहीही साध्य होण्याची 
शक्‍यता  नाही. जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत यावे असा सूर सध्या उमटत आहे. या सूताचा आधार  घेत त्या आघाडीचा सूर लावून नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या मदतीने उपमहापौर गटाला बाजूला ठेवत स्वतःचा महापौर ठरवू शकतील. मात्र त्यासाठी  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा होकार महत्त्वाचा आहे. असे समीकरण उपमहापौर गट आणि स्वाभिमानीलाही अपेक्षित आहे. कारण या दोघांनीही विरोधक म्हणून पुढच्या काळात शहरात स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या असा पवित्रा घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरूच आहे. त्या मोर्चेबांधणीचा भाग म्हणूनच महिनाभरात उपमहापौरांचा राजीनामा घेऊन काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यावर महापौर बदलासाठी दबाव वाढवला जाऊ शकतो. 

महापौर शिकलगार यांनी नेत्यांनी सांगितले तर  कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ असे सांगून राजीनामा मागणाऱ्यांना पुढचा महापौर आपण करू शकतो का,  याची समीकरणे मांडण्यासाठी उद्युक्त केले आहे. उपमहापौर गट आणि नेत्या जयश्री पाटील यांना एकत्र  ठेवू शकेल असा चेहराच महापौर होऊ शकतो. शिकलगार यांचा राजीनामा मागणाऱ्यांच्या यादीत असा चेहरा नाही. महापौरपदासाठी मोर्चेबांधणी करणारे त्यावेळचे आवटी अपात्र ठरले आहेत. ही बाजू महापौर शिकलगार यांच्यासाठी सध्या तरी जमेच्या ठरतात. त्याचवेळी नवा महापौर करून दाखवणे ही जयश्री पाटील यांच्यापुढचे आव्हान ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.