सांगली : जिल्ह्यात काँग्रेससाठी चार विधानसभा मतदारसंघांत अनुकूल वातावरण आहे. महाविकास आघाडीसमवेतच्या जागावाटपाच्या चर्चेत पक्षाने त्या जागांसाठी आग्रह धरावा, अशी मागणी आज जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत केली.
काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार तथा स्क्रिनिंग कमिटीचे चेअरमन मधुसूधन मिस्त्री यांच्याशी दिल्लीत गाठभेट झाली. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा विधानसभेच्या तयारीसाठी मेळावा घ्यावा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मारलेल्या मुसंडीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत ही त्याची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली खासदार विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नेत्या श्रीमती जयश्री पाटील आदींनी यावेळी जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थिती मांडली.
नेतेमंडळींनी येत्या काळात एकसंधपणे काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाईल, अशी ग्वाही दिली. श्री. वड्डेटीवार यांनी पक्षाला राज्यभरात अनुकूल वातावरण आहे. हे वातावरण कार्यकर्त्यांपर्यत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरीय मेळावा घ्यावा, अशी सूचना केली. बैठकीतील चर्चेची माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, ‘आम्ही आज नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री. मिस्त्री यांच्यासह सर्व पक्षनेत्यांची भेट घेतली.
श्री. मिस्त्री यांच्याकडे पक्ष संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे. पक्षाने त्यांच्याकडे स्क्रिनिंग कमिटीची जबाबदारी दिली आहे. आमच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी जिल्हाभरातील पक्षाची सद्यस्थिती जाणून घेतली. पक्षाने दिलेली जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, अशी त्यांनी सूचना केली. विधानसभानिहाय चित्र मांडले असता, जिल्ह्यातील काँग्रेस एकसंधपणे या निवडणुकीस सामोरे जाईल, अशी ग्वाही आम्ही त्यांना दिली आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.