सातारा : सातारा जिल्ह्यातील 14 महिन्याच्या बालकास ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बालरोग तज्ञ यांच्या सल्ल्यानुसार अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला आहे. याबराेबरच फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या 32 वर्षीय युवकाचा रिपाेर्टही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात दाेन जणांना काेराेनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. परंतू जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा यांना या प्रतिबंधात्मक आदेशातून वगळण्यात आले आहे. त्यानुसार अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नवीन काही आदेश काढले आहेत.
सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीतील खाजगी रुग्णालये, मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायीक, औषध दुकाने व संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना सर्व सोयीसुविधांसह आपल्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी किंवा ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी सुरु ठेवणे संबंधितांवर बंधनकारक राहिल. ही कार्यवाही करताना कोरोना विषयक प्रतिबंधात्मक बाबींच्या उपाययोजना (उद. हॅन्डवॉश, सॅनिटायझर) ठेवणे बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल.
पुसेगावात पाेलिसांना मास्कचे वाटप
पुसेगाव ः कोरोनाच्या प्रतिबंधासाठी असलेल्या जमावबंदीच्या काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन करून अत्यावश्यक सेवा, तसेच जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी पुसेगाव ग्रामपंचायत, पोलिस व आरोग्य प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी दररोज सकाळी 11 ते संध्याकाळी पाच या कालावधीत दुकाने उघडी ठेवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लोकांच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाच्या लढ्यात सहभागी झालेले पोलिस ठाणे व ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांना येथील कांदा- बटाट्याचे व्यापारी अशोक काटकर यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, माजी उपसरपंच रणधीर जाधव, चंद्रकांत जाधव, रामदास शेडगे उपस्थित होते. जमावबंदी आदेश दिलेला असूनही काही लोक वाहने घेऊन फिरताना आढळल्याने पुसेगाव पोलिसातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणाऱ्या 50 जणांवर कारवाई करण्यात असून, यापुढे अशा वाहनचालकांची वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.