सांगली - तिच्या डोहाळे जेवणासाठी हिरवी साडी, फुलांचा हार, पाच फळे आणि ओटी हे सारे आणले होते. परिसरात भव्य मंडपही घातला होता. सायंकाळी सूर्यास्ताच्या आधी कार्यक्रस सुरवात झाली. साऱ्या कॉलनीला आवतन धाडले होते. अगदी थाटामाटात झालेल्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाने गौरीही तृप्त झाली. ही गौरी म्हणजे गाय.
सांगली गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरातील माजी नगरसेवक युवराज गायकवाड आणि कुटुंबीयांची सदस्य असणारी ही देशी गाय गौरी. गायकवाड यांनी मोठ्या प्रेमाने तिचे संगोपन केले आहे. गाईमुळे घरी लक्ष्मी वास करते अशी त्यांची श्रद्धा. या गाईचे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय गायकवाड कुटुंबीयांनी घेतला. तसेच गायकवाड दरवर्षी विश्रामबागमधील म्हसोबाची जत्राही दरवर्षी अशीच थाटामाटाने करीत असतात. त्यामुळे गायकवाड यांनी आवतन धाडताच या डोहाळे जेवणालाही महिला धावल्या. सर्व प्रकारची फळे, पेंड घेऊन अनेकजणी आल्या होत्या. सुहासिनींनी ओवाळणी करून गाईची ओटी भरली. नवी साडी चोळी भरून दिली. वाद्याच्या आवाजात महिलांनी पाळणा गीत गायले. उपस्थितांसाठी सुग्रास भोजनाची सोय होती. गौरीबरोबर सर्वांनी त्याचा लाभ घेतला.
देशी गाईंचे प्रमाण कमी होत चालले असताना गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी ही गाय आणली. तिला घरचे सदस्य म्हणून संगोपन केले. त्यांनी यानिमित्ताने गाईचे पावित्र्य आणि उपयुक्तता याविषयावर व्याख्यानही आयोजित केले होते. शिवाजी गायकवाड, सुमित्रा गायकवाड, प्रशांत गायकवाड, हर्षदा गायकवाड, आरती गायकवाड, राजश्री जाधव, सौरभ जाधव यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.