कऱ्हाड - महिलांना मानसन्मान देण्याच्या अनेक गोष्टी केवळ बोलल्या जातात. महिलांसह युवतींच्या छेडछाडीचे प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेकदा अपयश आल्यासारखी स्थिती दिसते. मात्र, पोलिस खात्याने स्थापन केलेल्या निर्भया पथकामुळे महिलांसह युवतींचा मानसन्मान वाढताना दिसतो आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या निर्भया पथकाने अवघ्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील आठ हजार लोकांवर विविध प्रकारे कारवाई करत त्या पथकांनी महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. महिलांचा सन्मान वाढवणाऱ्या निर्भया पथकाच्या जिल्ह्यातील कारवाईकडे लक्ष वेधले असता त्यातून अनेक गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्याने त्या संबंधीच्या गुन्ह्यांत घट झाल्याचेच दिसते आहे.
सहा महिन्यांत कारवाई
जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांतर्गत दहा निर्भया पथके स्थापन करण्यात आली आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये स्थापन झालेल्या निर्भया पथकांनी सहा महिन्यांत बेडधक कारवाई करत महिलांबाबत घडणारे गुन्हे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील निर्भया पथकाचे नियंत्रण पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे आहे. मोठ्या पोलिस ठाण्यांत स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.
लहान पोलिस ठाण्यांत तीन महिला कर्मचाऱ्यांचे पथक कार्यान्वित आहे. ज्या ठिकाणी पथक स्थापन केले आहे, त्या ठिकाणी एक पोलिस अधिकारी, दोन पुरुष व दोन महिला पोलिस देण्यात आलेले आहेत. दहाही पथकांना स्वतंत्र दहा मोठी वाहने देण्यात आली आहेत. त्या प्रत्येक निर्भया पथकाला एक पेन कॅमेराही शासनाने दिला आहे. पोलिस ठाण्यांत स्वतंत्र जागाही देण्यात आली आहे. त्या पथकाने शाळा, कॉलेजस्तरावर प्रबोधनाचे कार्यक्रम करण्याचे बंधनही त्यांच्यावर आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांशी शाळा, महाविद्यालयांत पोलिस ठाण्यांतील निर्भया पथकांशी समन्वयीत असे स्वतंत्र पथक स्थापन झाले आहे. त्या पथकाद्वारे शाळा, महाविद्यालय परिसरात कारवाई करण्यात येते. त्याशिवाय महिलांच्या छेडछाडीसंबंधीत अशा गुन्ह्यांची माहिती काढून त्यावर कारवाई केली जाते. जिल्ह्यात आजअखेर चार हजार ५२१ लोकांवर कारवाई केली आहे. दोन हजार २९३ लोकांचे त्यांच्या कुटुंबीयांसमोर समुपदेशन केले आहे. शाळा, महाविद्यालयांसह सामुदायिक अशा सुमारे ६३५ ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले आहेत. जिल्ह्यात छेडछाड करणाऱ्या सुमारे एक हजार लोकांवर कायद्यान्वये कारवाई केली आहे.
...अशी होते कारवाई
महाविद्यालयीन युवतींची छेडछाड करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे एक हजार पाच सडकसख्याहरींवर कारवाई झाली आहे. त्यामागे पोलिसांनी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत ठेवलेल्या तक्रारपेटीच कारणीभूत आहे. ज्या युवतींना सडकसख्याहरींचा त्रास होतो, त्यांनी त्या तक्रारपेटीत विनानावाची लेखी तक्रार टाकण्याचे आवाहन केले जाते. त्यात येणाऱ्या तक्रारीवर शंभर टक्के कारवाई होत असल्याने त्यातून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कारवाई करण्याचे प्रमाणही वाढल्याने त्या छेडछाडीचे प्रमाण घटल्याचे दिसते. शाळा, महाविद्यालये सोडून ज्या ठिकाणी कारवाई केली जाते, ती ठिकाणे निर्भया पथकातील पोलिस आयडेंटीफाईड करतात.
त्यानंतर तेथे महिला पोलिसांना साध्या वेशात पाठवले जाते. तेथे छेडछाड करणारा सापडला, की त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे युवतींसह महिलांच्या छेडछाड होण्याच्या प्रकारांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शाळा, महाविद्यालयांतून आलेल्या तक्रारींवर कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक मोठी कारवाई झाली आहे. त्यात निर्भया पथकाने सुमारे ५०० सडकसख्याहरींवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे. ३३० सडकसख्याहरींचे त्यांच्या कुटुंबीयांदेखत समुपदेशन केले आहे. दाखल झालेल्या ४० अर्जांवर कारवाई झाली आहे. तालुक्यात ५३ विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन झाल्या आहेत. ९१ प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले आहेत. १५ लोकांवर न्यायालयात खटले पाठवले आहेत.
जिल्हानिहाय निर्भया पथकाची कारवाई
विभागाचे नाव - कारवाई - समुपदेशन संख्या - प्रबोधन केलेल्यांची संख्या - छेडछाडीविरोधी कारवाई
सातारा - ६४९ - ५१७ - ६३ - १७०
कोरेगाव - ७६९ - १४५ - ७९ - १३२
कऱ्हाड - ४१७ - २६० - ११७ - १२६
वाई - ७५४ - ४८९ - ८५ - १८८
फलटण - ९५८ - ५०३ - १३८ - १९७
दहिवडी - ५८१ - २१६ - ६६ - ९७
पाटण - ३९३ - १६३ - ८७ - ९५
महाविद्यालयीन युवतींसह महिलांच्या छेडछाडीचे जिल्ह्यात जास्त प्रमाण होते. मात्र, निर्भया पथकामुळे त्या सगळ्याच गोष्टीला आळा बसला. त्याशिवाय महिलांबाबत अत्यंत गोपनीय असलेल्या गुन्ह्यांसारख्या प्रकाराचीही माहिती पोलिसांपर्यंत येण्यास मदत झाली आहे. निर्भया पथकाच्या बेधडक कारवाईमुळेच ते शक्य झाले आहे.
- राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.