Crime News : जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ५० लाखांची फसवणूक! तिघांवर गुन्हा

Fraud
Fraud esakal
Updated on

कऱ्हाड : पैसे गुंतवल्यास प्रतिमहिना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जानेवारी २२ ते मे २३ या दरम्यान हा प्रकार झाला असून, त्याप्रकरणी शहाजी गणपती पाटील (रा. बहे-तांबवे, ता. वाळवा) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

Fraud
Sharad Pawar : लग्न होत नसल्यामुळे पवारांना मारण्याची धमकी; तपासातून धक्कादायक खुलासा

त्यावरून हणमंत भगवान लोखंडे (रा. बहे- तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली), प्रमोद बाळू लोंढे (रा. मुंढे, ता. कऱ्हाड) व प्रकाश सदाशिव नायकवडी (रा. विंग, ता. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकारामुळे कऱ्हाडसह वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांची माहिती अशी की शहाजी पाटील यांना गावातीलच हणमंत लोखंडे याने तुमच्याकडे काही रक्कम असेल, तर तुम्ही चार टक्के परतावा देतो. मी कंपनीत डायरेक्टर पदावर आहे. तुम्ही जी रक्कम गुंतवणार त्याचे मला दोन टक्के कंपनीकडून कमिशन मिळते व तुम्हाला चार टक्के परतावा मिळणार आहे. तुमच्याकडे आता पैसे नसतील तर तुम्ही कर्ज काढून पैसे भरा फायदा मिळेल, तसेच सदर रकमेचे एक वर्षांनंतरचे चेक तुम्हाला देणार असल्याने मूळ रकमेची पूर्ण खात्री आहे, असे सांगितले.

त्यानंतर लोखंडे हा शहाजी पाटील यांना घेऊन मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला‌‌. तेथे शहाजी पाटील यांची प्रमोद लोंढे व प्रकाश गायकवाड यांच्याशी भेट घालून दिली. त्या वेळी त्यांनीही शहाजी पाटील यांना तुम्हाला चार टक्के परतावा मिळेल, निर्धास्त राहा, असे सांगितले.

Fraud
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

शहाजी पाटील यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाच लाख रुपये कर्ज काढून त्यातील दोन लाख दहा हजार रुपये प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवले. त्या वेळी लोखंडे याने प्रमोद लोंढे यांच्या अकाउंटचा चेक शहाजी पाटील यांना दिला. पुन्हा शहाजी पाटील यांनी पत्नी राजश्री पाटील हिच्या नावावर तीन लाख ८० हजार रुपये कर्ज काढून ती सर्व रक्कम प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवली. त्याही रकमेचा चेक लोखंडे याने पाटील यांना दिला.

त्या रकमेचे चार ते पाच हप्ते पाच टक्के परताव्याने शहाजी पाटील यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, ऑक्टोबर २०२२ पासून परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे शहाजी पाटील यांनी लोखंडे, लोंढे व गायकवाड यांना याबाबत विचारणा केली. त्या वेळी मार्केट डाऊन आहे, नंतर पैसे मिळतील सहा महिने थांबा असे सांगितले. त्यानंतर शहाजी पाटील यांनी मलकापूरमधील ऑफिसमध्ये जाऊन संबंधितांची भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या रकमेचा परतावा मिळेल, असे सांगितले.

त्यानंतर शहाजी पाटील यांनी जानेवारी २०२३ मध्ये त्यांना दिलेला चेक वटविण्यास बँकेत गेले. त्यावेळी प्रमोद लोंढे यांच्या बँक खात्यावर रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी तपास करत आहेत.

आणखी फसवणूक झाल्याचे निष्पन्न

शहाजी पाटील यांची फसवणूक झाल्यावर त्यांना आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची माहिती समजली. त्यानुसार विश्वास निवृत्ती मोहिते (तीन लाख १० हजार), मालोजी तातोबा सरगर (२० हजार), वसंतराव रामचंद्र देशमुख (दोन लाख १० हजार, सर्व रा. बहे-तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली), विनायक शिवाजी तोडकर (पाच लाख १० हजार), अक्षयकुमार बाळासाहेब पाटील (१४ लाख १० हजार), अमोल आनंदराव देसाई, सुयश उल्हास देसाई (दोघेही रा. वाठार, ता. कऱ्हाड) यांचीही अनुक्रमे १२ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे शहाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.