सांगली : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी तसेच पर्यटनांच्या दृष्टीने राज्यातील पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा हद्दीपर्यंतच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या ८०२.५८२ किलोमीटरच्या अंतिम आखणीस शासनाने मान्यता दिली आहे.
या द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा मार्ग जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्हा आणखी एका महामार्गावर येणार आहे.
राज्यात धार्मिक यात्रा करण्याची परंपरा आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पर्यटनही होते. या धार्मिक पर्यटन यात्रेमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेऊन शासनाने सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा "महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग" करण्याचा प्रस्ताव केला आहे.
महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. तसेच अंबाजोगाईही या महामार्गावर येते.
याबरोबरच मराठीचे आद्यकवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, १२ ज्योर्तिलिंग पैकी औंढानागनाथ व परळी वैद्यनाथ येथील दोन ज्योर्तिलिंग, पंढरपूरचे विठ्ठल-रुखमाई मंदीरही या महामार्गावर. तसेच अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळेही या शक्तिपीठ महामार्गाने जोडली जाणार आहेत.
शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंघदुर्ग या १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा महामार्ग पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र हद्दीवर जोडणे प्रस्तावित आहे. यामुळे महाराष्ट्राचे विदर्भ आणि कोकण ही दोन टोके जोडली जाणार आहेत.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे गोवा राज्याच्या सिमेपर्यंत जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा हा महामार्ग गोवा राज्याच्या हद्दीतील पत्रादेवी या धार्मिक स्थळाला जोडला जाईल. तर नागपूर वर्धा हे समृद्धी महामार्गाने जोडले आहेत.
सहा मार्गिका असणाऱ्या या द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ २२ तासांवरून थेट ८ ते ११ तासांवर येईल असा अंदाज आहे. प्रारंभीच्या टप्प्यात हा महामार्ग ७६० किलोमीटरचा असेल असे सांगण्यात येत होते. त्यात वाढ होऊन तो आता ८०३ किलोमीटर झाला आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील सर्वात लांब महामार्ग ठरणार आहे. मुंबई नागपूर हा समृद्धी महामार्ग सध्या राज्यातील ७०१ किलोमीटरचा सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे. परंतु शक्तिपीठ महामार्ग हा ८०३ किलोमीटरचा असून तो राज्यातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग होणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात बाणुरगड येथे प्रवेश करणार आहे. तेथून कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगीवरून तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीपर्यंत येईल. तेथून मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसुर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडीवरून कोल्हापूर जिल्ह्यात निमशिरगाव येथे प्रवेश करणार आहे.
महामार्गांपासून वंचित असलेला सांगली जिल्ह्यात आता महामार्गाचे जाळे तयार होत आहे. जिल्ह्यात सध्या चार महामार्ग आहेत. यातील पेठ-सांगली महामार्गाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. याशिवाय आता पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडोर हा महामार्ग प्रस्तावित आहे. त्याचबरोबर आता शक्तिपीठ महामार्गही जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूणच आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.