कोल्हापूर ः झांज पथक, लेझीम, बॅंडच्या साथीने रस्सीखेच, पथनाट्य, मर्दानी खेळ, पोवाडे अशा महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची धमाल. त्याला राणादा आणि अंजलीच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आलेली रंगत, असे महिलाराजचे वातावरण आज पोलिस मैदानावर पहावयास मिळाले. निमित्त होत कोल्हापूर पोलिस दलातर्फे रेझिंग डे निमित्त सायबर सेफ वुमेन आणि सायबर सखी मेळाव्याचे.
हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात
कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापौर सुरमंजिरी लाटकर, मधुरीमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे, उद्योजिका अरूंधती महाडिक, माजी नगरसेविका माधुरी नकाते आदींसह अभिनेता हार्दिक जोशी (राणादा ) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (अंजली बाई) यांची प्रमुख उपस्थित होती.
हार्दिक जोशी, अक्षया देवधर आगमन झाले. तसे महिलांसह जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थींनीनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. महिला विद्यार्थींनी विरुद्ध महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यात रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. महिला आणि मुलीचे नेतृत्व महापौर सुरमंजिरी लाटकर, मधुरीमाराजे छत्रपती यांनी तर पोलीस दलाच्या गटाचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे, पद्मा कदम यांनी केले. दोन्ही गटाच्या समर्थकांनी खेळाडूंना चिअरअप केले. रंगतदार झालेला हा सामना महिला पोलिसांनी अखेरीस जिंकला. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला महिला जिल्हाधिकारी, महापौर कोण? अशा सामान्य ज्ञानात भर टाकणाऱ्या प्रश्नोत्तराचा तास झाला. प्रश्नांची उत्तरे देण्यात विद्यार्थींनी आघाडीवर होत्या. विजेत्यांचा बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला. पोलिस दल व निर्भया पथकातर्फे महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी सायबर सेफ वुमेन या विषया अंतर्गत सायबर सुरक्षाविषयक माहिती दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....
रॅलीस प्रतिसाद
यानंतर पोलिस मैदान ते धैर्यप्रसाद चौक या मार्गावर रॅली काढण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. यात मुलींचे लेझीम पथक, झांज पथक, ढोलपथक आदी सहभागी झाले होते. रणरागिणी पथनाट्य ग्रुपतर्फे पथनाट्य आणि शाहीर रंगराव पाटील यांनी पोवाडा सादर केला. यावेळी प्रशिक्षणार्थी अपर पोलिस अधीक्षक अश्विन कुमार, पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, प्रा. नंदिनी साळुंखे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक अनिता मेणकर यांनी केले.
|