आईच्या पार्थिवाला ज्येष्ठ मुलीने दिला भडाग्नी

आईच्या पार्थिवाला ज्येष्ठ मुलीने दिला भडाग्नी
Updated on

भिलार (जि. सातारा) : सध्याच्या रूढी, परंपरांना छेद देत महाबळेश्वर तालुक्‍यातील दुधगावमध्ये ज्येष्ठ मुलीच्या हातून आईच्या पार्थिवाला भडाग्नी देऊन परिवर्तनवादी कृती करण्यात आली.
 
दुधगाव हे गाव प्रथमापासूनच तालुक्‍यातील सामाजिक परिवर्तनवादी विचार जोपासाणारे गाव. या गावातील तानाबाई हरिभाऊ यादव (वय 96) यांचे निधन झाले. श्रीमती यादव यांनी त्यांच्या जीवनात स्वतः मोलमजुरी करून सहा मुले व तीन मुलींना ऐपतीप्रमाणे शिक्षण दिले. त्यापेक्षाही माणुसकी आणि दुसऱ्याला सहकार्य करण्याचे संस्कार पेरले आणि आदर्श कुटुंब पद्धतीचा चांगला आदर्श घडविला. आईच्या पार्थिवाला ज्येष्ठ मुलगाच अग्नी देतो. ही परंपरा मोडीत काढत ज्येष्ठ बहिणीच्या हस्ते आईच्या पार्थिवाला भडाग्नी देण्यात यावे, असा विचार पुढे आला. त्यानुसार तानाबाई यांच्या पार्थिवाला ज्येष्ठ कन्या सोनाबाई आनाजी कदम व ज्येष्ठ पुत्र शिवराम हरिभाऊ यादव यांनी एकत्रितरीत्या भडाग्नी दिली.
 
तथ्यहीन, कालबाह्य परंपरांचा त्याग करणे म्हणजेच पुरोगामी चळवळ पुढे चालवणे हेच असते. समाजात चांगला बदल हवा असेल तर त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी, याची प्रेरणा घेऊन, हळूहळू समाजात बदल होऊन आदर्श समाज घडत जातो, अशी भूमिका डॉ. कुलदीप यादव व दिलीप यादव यांनी मांडली.

हेही वाचा : बापरे...पुणे बंगळूर महामार्गावर भीषण आग

लई भारी : साताऱ्यातील पोलिसांनी त्याच्या मुसक्‍याच आवळल्या

सावकारांच्या शोधात पोलिस पथके रवाना 

औंध  (जि. सातारा) : व्याजाने घेतलेल्या दहा लाख रुपयांचे पंचाहत्तर लाख रुपये द्यावे लागतील, तरच तुमच्या मिळकतीची कागदपत्रे परत मिळतील, अशी धमकी डॉक्‍टर महिलेस दिल्याप्रकरणी मोटेवाडी (ता. माण) येथील खासगी सावकारासह अन्य तिघांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आज संबंधित संशयितांसह खासगी सावकारांच्या शोधात औंध पोलिस म्हसवड- सांगोला परिसरात रवाना झाले आहेत.
 
यामध्ये पैसे देणारा सर्जेराव संभाजी मोटे (रा. मोटेवाडी, ता. माण), मध्यस्थी धनाजी शिवाजी गायकवाड व गजानन आप्पासाहेब गायकवाड (रा. शेटफळे, ता. आटपाडी) व अतुल वसंत घयाळे (रा. जावला, ता. सांगोला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध पोलिस ठाण्यामध्ये सावकारीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने खटाव तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत डॉ. हर्षदा मुकुंद इंगळे (मूळ रा. औंध, हल्ली रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. हर्षदा इंगळे या पेठ वडगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांना व त्यांचे पती कपिल भरत कुलकर्णी यांना सोलर व वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी पैशाची गरज होती. त्यासाठी दहा लाख रुपये पाहिजे होते. त्यामुळे त्यांनी आपली ही गरज कपिल कुलकर्णी यांचे मित्र धनाजी गायकवाड, गजानन गायकवाड व अतुल घयाळे यांना सांगितली. त्यानंतर वरील तिघांनी सर्जेराव मोटे यांनी दहा लाख रुपये देतो; पण त्याबदल्यात तुम्हाला महिन्याला तीन टक्के व्याज द्यावे लागेल व मिळकत लिहून द्यावी लागेल, असे बजावून पैसे दिले होते. त्यानंतर सर्जेराव मोटे यांना व्याजाचे पैसे देण्यास इंगळे गेल्या असता त्यांनी तीन टक्के नाहीतर पंधरा टक्के व्याजाने पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी चार महिने पंधरा टक्के व्याजाने पैसेही मोटे यांना दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर आर्थिक मंदी आल्याने मूळ रक्कम व व्याजाचे पैसे इंगळे देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर सर्जेराव मोटे यांनी मध्यस्तींमार्फत जून 2019 मध्ये दहा लाखांचे पंधरा टक्के व्याजदराने पंचाहत्तर लाख रुपये झाले आहेत. जर तुम्ही ही रक्कम दिली नाही तर तुमची मिळकत मिळणार नाही, असे सांगून पैशासाठी समक्ष भेटून व फोनवरून दमदाटी करू लागल्याने ही फिर्याद दिली. हर्षदा इंगळे यांना पैसे मिळवून देण्यासाठी मध्यस्थी तिघांनी नव्वद हजार रुपये कमिशन घेतले होते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.

हेही वाचा : रायबाच्या शिक्षणासाठी लाखमोलाची मदत; तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांची भावना

जरुर वाचा : ...म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी

अवश्य वाचा : सातारकरांनाे सावधान! जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.