संकेश्वर - वनमंत्री उमेश कत्ती यांनी हुक्केरी मतदार संघाचा कायापालट केला आहे. यापुढेही संकेश्वरसह परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. उत्तर कर्नाटकाचा संपूर्ण विकास हे आमचे ध्येय आहे. मंत्री कत्तींच्या मार्गदर्शनाखाली उत्तर कर्नाटकाचा विकास केला जाईल. सत्ता शाश्वत नसून केलेली कामे शाश्वत राहणार आहेत, हे लक्षात ठेवून आमचे सरकार पॉवर पॉलिटिक्स न करता पब्लिक पॉलिटिक्स करणार आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामपंचायतीतून सर्व योजना व सुविधा देण्याचा प्रयत्न करु. 'सरकार आपल्या दारी योजना' यशस्वी करू, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.
संकेश्वर शहरात शनिवारी (ता. २५) सायंकाळी विविध विकासकामांचे उदघाटन झाले. यावेळी ते उदघाटक या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी वनमंत्री उमेश कत्ती होते. व्यासपीठावर विविध खात्याच्या मंत्र्यांसह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, येत्या 26 जानेवारीपासून सरकारी सेवांचे विकेंद्रीकरण होणार असून लोकांच्या घरांमध्ये सेवा उपलब्ध होईल. त्यासाठी सरकार सर्व तयारी करत आहे. शिष्यवृत्ती योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मुलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे सरकार गावांच्या विकासाला पुढे नेत आहे. येथील तलाव भरणी व सिंचन प्रकल्पांसाठी प्राधान्य देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील दूरदर्शी योजनांची पुरेशी अंमलबजावणी करून सरकार सर्वांगीण विकासासाठी काम करेल. वर्ष अखेरीस संकेश्वर शहरासाठी ड्रेनेज व्यवस्था राबविण्यासाठी मंजुरी दिली जाईल.'
संकेश्वर येथे सायंकाळी हायटेक बसस्थानक, नगरपालिका इमारत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांचे निवासी वसतिगृह, रयत संपर्क केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वागत तर माजी रमेश खासदार कत्ती यांनी प्रास्ताविक केले.
गृहनिर्माण व सुविधा विकास खात्याचे मंत्री डी. सोमन्ना, परिवहन मंत्री रामलु, मंत्री बी. व्ही. बसवराज यांचे भाषण झाले. मंत्री उमेश कत्ती यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्य सरकारचे प्रमुख प्रतोद आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार दुर्योधन एहोळे, आमदार हनमंत निराणी, नगराध्यक्षा सीमा हतनुरे, उपनगराध्यक्ष अजित करजगी, निखील कत्ती, पृथ्वी कत्ती, पवन कत्ती, राजेंद्र पाटील, अमर नलवडे, पवन पाटील, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, मुख्याधिकारी जगदीश ईटी, परिवहनचे चिक्कोडी विभागीय नियंत्रणाधिकारी व्ही. एम. शशीधर, बेळगाव जिल्हा प्रादेशिक आयुक्त अबलानी विश्वास, उत्तर विभागाचे लोकायुक्त एन. सतीशकुमार, परिवहन विभागाचे अजय नागभूषण, नगरविकास खात्याचे संचालक डी. बी. कावेरी, बेळगाव जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांच्यासह जिल्हा, तालुका, ग्राम पंचायत सदस्य, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.