सामाजिक संदेशांमुळे लग्नपत्रिकेची चर्चा

Discussion of wedding papers due to social messages
Discussion of wedding papers due to social messages
Updated on

नगर ः लग्नसराईची धामधूम सध्या सुरू आहे. अनेक जण आपल्या परीने व समाजाच्या नजरेत भरेल अशीच पत्रिका करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मुकिंदपूर (ता. नेवासे) येथील एका लग्नपत्रिकेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. "मुलगा-मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान' यासारखे दहा संदेश असलेली ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

सोशल मीडियाच्या जमान्यातही लग्नपत्रिका छापल्या जात आहेत. या पत्रिका छापताना समोरच्याच्या मनाला कशा भावतील, याकडे प्रत्येक जण विशेष लक्ष देत असतो. आपल्या यथाशक्ती पत्रिकांची निवड करून त्या छापल्या जात आहेत. तसाच काहीसा प्रयत्न मुकिंदपूर (ता. नेवासे) येथील संदीप ताकपेरे यांच्या मुलीच्या लग्नात केलेला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्याची पत्रिका वेगळी कशी राहील, नातेवाईक व मित्रपरिवाराला त्यातून काय संदेश द्यावा, याचा विचार केला. मग त्याप्रमाणे पत्रिका छापण्याचे नियोजन केले. मात्र, पत्रिकेवरील नेमका कोणता मजकूर टाळायचा, हा मुद्दा त्यांच्यापुढे उभा राहिला.

समाजात चांगला संदेश देण्यासाठी त्यांनी मग पत्रिकेवर असलेले स्वागतोत्सुक, आशीर्वाद, कार्यवाह आदींना फाटा देण्याचा निश्‍चय करून ती जागा सामाजिक संदेशांना दिली. "मुलगा-मुलगी आहे समान, दोघेही उंचावतील देशाची मान', "पाणी वाचवा, वृक्ष वाचवा', "नेत्रदान श्रेष्ठ दान', "रक्तदान श्रेष्ठ दान', "स्वच्छता मोहीम', "सर्व शिक्षा अभियान', "जय जवान जय किसान' आदी संदेश या पत्रिकेच्या माध्यमातून देऊन त्यांनी समाजजागृतीचे काम केले आहे. या सामाजिक संदेशांमुळे या पत्रिकेने सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घातला असून, अनेक ग्रुपवर सध्या त्याची चर्चा सुरू आहे. 

या पत्रिकेच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळत असून, काही जण आपल्या घरातील कार्याच्या वेळीही असाच काहीसा उपक्रम हाती घेऊन जनजागृती करण्याचा संकल्प करू लागले आहेत. 

नेत्रदानाचा संकल्प 

संदीप ताकपेरे यांची कन्या प्रिया व भाऊसाहेब अनारसे यांचा मुलगा विशाल हे दोघेही विवाहबंधनात अडकल्यानंतर या दोन्ही कुटुंबांनी नवदाम्पत्यासह नेत्रदान करण्याचा संकल्प केला. संकल्पपत्र यशवंत प्रतिष्ठानाकडे सादर केले. या प्रसंगी प्रतिष्ठानाचे बाबासाहेब कराळे, समीर शेख आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.