सोलापूर : सरसकट कर्जमाफीच्या आशेवरील शेतकऱ्यांनी बॅंकांकडे फिरकणेच बंद केले आहे. बॅंकांच्या तगाद्यामुळे पैसे भरायला असलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून लेखी हमीपत्राची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती अन् थकबाकी वसुली थांबवण्याच्या आदेशामुळे मागील दोन वर्षात थकबाकीत मोठी वाढ झाली. त्यामुळे सोलापूर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, अकोला यासह 16 बॅंका मेटाकुटीला आल्या असून राज्यातील 31 जिल्हा बॅंकांची कृषी कर्जाची थकबाकी 28 हजार 970 कोटींपर्यंत पोहचली आहे.
हेही वाचाच...'एमपीएससी'च्या अर्धवट पॅनलअभावी भावी फौजदारांची 'परीक्षा'
नापिकी, डोक्यावरील सावकारी व बॅंकांच्या कर्जाचा बोजा, अवकाळी, अतिवृष्टी, महापूर अशा प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षात राज्यातील 16 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात दिवसेंदिवस वाढच होत असून राज्यात दिवसाला सरासरी चार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध राजकीय पक्षांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करीत सत्तेवर आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, अशी घोषणाही केली. त्याच राजकीय पक्षांच्या हाती सत्ता आल्याने बळीराजाला सात-बारा कोरा होईल, अशी आशा लागली. दरम्यान, जिल्हा बॅंकांनी मार्चएण्डपर्यंत थकबाकी वसूल करुन एनपीए (अनुत्पादित कर्ज) कमी करण्याच्या दृष्टीने ठोस कृती आराखडा तयार केला. मात्र, गावोगावी मेळावे घेऊनही शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याने बॅंकांच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचा अनुभवही बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सकाळ शी बोलताना सांगितला. आता सरसकट कर्जमाफीच्या आशेवरील बॅंकांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आकडेमोडीला सुरवात केली आहे.
हेही वाचाच...ठरलं...कर्जमाफीची कट ऑफ डेट 31 ऑगस्ट !
मेळावे घेऊनही शेतकऱ्यांचा नाही प्रतिसाद
मार्चएण्डपर्यंत शेतीसह बिगरशेती कर्जाच्या वसुलीचा कृती कार्यक्रम तयार केला. गावोगावी मेळाव्यांचे नियोजनही केले मात्र, बहूतांश गावांमधील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. तर काही शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी दाखविली मात्र, भरलेली रक्कम परत मिळेल याची हमी मागत आहेत. त्यामुळे वसुली ठप्प असल्याने व्यवहारावर परिणाम झाला असून आता बॅंकांनाही कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर
हेही वाचाच...सोलापूर जिल्हा बॅंकेला मिळणार 879 कोटी !
राज्याची स्थिती
एकूण जिल्हा बॅंका
31
विकास सोसायट्या
16,529
कृषी कर्जाची थकबाकी
28,970 कोटी
थकबाकीदार शेतकरी
43.09 लाख |
|
|