सांगली-कोरोना सारख्या इलाज नसलेल्या रोगापासून दूर राहण्यासाठी सर्व देशासह सांगली जिल्ह्याला गृहबंद करून ठेवणारा चाळीस दिवसांचा लॉकडाऊन रविवारी संपला. त्यानंतर काही सवलतींची घोषणा करून मे 17 तारखेपर्यंत सुरू झालेल्या सवलतीच्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती सुधारेल की नाही ? याचे उत्तर सध्या कुणाकडेच नसले तरी सध्या सभोवताली निर्माण होत असलेले गोंधळाचे वातावरण अनेक प्रश्न निर्माण करताना दिसत आहे. प्रथमदर्शनी किरकोळ वाटणाऱ्या गोंधळाच्या समस्या कोणत्याही क्षणी अक्राळ-विक्राळ रूप धारण करू शकतात याचे भान सुटल्यास सोशल डिस्टंसींगचे रूपांतर कोणत्याही क्षणी समाजिक विस्फोटात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपूर्ण जगभर होणारा कोरोनाचा प्रसार आणि त्यामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या आता लाखांच्या घरात पोहचली आहे. जगभरात हाहाकार उडवून देणारा कोरोनाचा विषाणू देशासोबत राज्यात आणि सांगली जिल्ह्यातही कोरोना पोहचला. सुरवातीला इस्लामपूरातील काही जणांना लागण झाली. त्यानंतर सांगलीतील एका बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पाहता पाहता संपूर्ण जिल्ह्यात नसला तरी काही तुालक्यात कोरोनाचे पेशंट सापडू लागले. या संपूर्ण कालावधीत जिल्हा प्रशासनाने निश्चितच जाबबदारीने आणि अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने उपचार आणि क्वारंटाईनसाठीच्या उपाययोजना राबवल्या. त्याचा निश्चितच फायदा सांगली जिल्ह्यातील जनतेला झाला. याकाळात जिल्ह्यातील काही ठिकाणे कडकडीतपणे बंद करण्यात आली.
कोरोनाचा धोका ओळखून ज्या-त्या परिसरातील नागरीकांनीही अतिशय स्वंयशिस्तपणे प्रशासनास सहकार्य केले. परराज्यातून व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या सीमा लॉक करण्यात आला. यातूनही काहींनी पळवाट शोधून येण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. काहींना होम तर काहींना इंस्ट्युट्युशनल क्वारंटाईनही करण्यात आले. मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयात कारोना टेस्टिंग लॅबही उभारण्यात आली. आरोग्य विभागाच्या सहकार्यातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा उभारण्याचे शिवधनुष्यही प्रशासनाने लिलया पेलले. परंप्रांतिय कामगरांसाठी रहिवासी केंद्रे उभारली त्यांच्या खाण्यापिण्याचाही बंदोबस्त केला. दानशूरमंडळींनीही प्रशासनाच्या कामाची दखल घेत शक्य ती मदत प्रशासनाला केली.
बाजार सुरू झाल्यानंतर उडणारा सोशल डिस्टंसींगचा फज्जा लक्ष्यात घेवून लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्याचीही सुविधा प्रशासनाने उपल्बध करून दिली. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या सफाई कर्मचाऱ्यांनीही रात्रीचा दिवस करून परिसर स्वच्छतेचे काम अतिशय काटेकोरपणे केल. जिल्ह्या पोलिस प्रशासनानेही जनतेचा जीव म्हणजे आपलाच जीव आहे अशी भावना ठेवून जिल्ह्यात अतिशय कौतुकास्पद कामगीरी केली. आरोग्य पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला मोलाची साथ दिली ती गावोगावच्या कारभाऱ्यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात लोकांनाही कोणातही त्रास न होता गावोगावी लॉकडाऊन यशस्वी करण्यात लोक सहभागही तितकाच उल्लेखनीय ठरला. चाळीस दिवसांच्या काटेकोर लॉकडाऊनच्या पालनानंतर उद्योगचक्र सुरू होणे तितकेच अवश्यक असल्याने प्रशासनाने त्याचीही तयारी सुरू ठेवली हेही तिकेच स्वागतार्ह आहे.
मात्र, सध्या सोमवारपासून सुरू झालेल्या सवलतीच्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत असून 40 दिवसात कमवलेले आता गमवण्याचीही भिती गर्दीचा भाग होवून फिरणाऱ्यांना वाटत नसल्याचे चित्र दिसत आहे. रेशन दुकांनाच्याही पुढे लागल्या नाहीत इतक्या रांगा दारू दुकांनपुढे लागल्या आणि कारोनाची एैसेकीतैसी म्हणणारे महाभाग या गर्दीत दिसू लागले आहेत. प्रशासनाने काही दुकानांना सशर्त परवानगी दिल्याने अनेक छोट-मोठ्या व्यवसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले. अनेक ठिकाणी मास्क वापरण्यासह सोशलडिस्टंसिंगचे पालन सुरू असले तरी बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. निश्चितच हातावर पोट असलेल्या अनेकांचा संसार चक्राचा अडलेला गाडा सुरू होण तितकेच अवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या चौकटीत राहूनच कार्यरत राहणे सर्वांसाठी अत्यावश्यक असून याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न समाजासाठी घातक ठरणार आहे. सामाजिक अंतर पाळण्याबाबत थोडीही चुक झाली तर दबा धरून बसलेला अदृश्य कोरोना विषाणू कोणत्याही क्षणी मृत्यूचे तांडव उभा करेल याचे भान ठेवले तरच सवलतीच्या लॉकडाऊनची गोड फळे चाखायला मिळतील. यासाठी फक्त प्रशासनाचा दंडुकाच उपयोगी पडणार नसून लोकांचा स्वयंस्फूर्त सहभागच कोरोनाला रोखण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.