...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले 

...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले 
Updated on

नागठाणे (जि. सातारा) : गेले दोन महिने तेजसच्या वाटेकडे डोळे असताना अचानकपणे त्याच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली. सदैव हसणाऱ्या, खेळणाऱ्या, अंगणात रेंगाळणाऱ्या तेजसच्या कायमच्या जाण्याने त्याच्या घरासमोरचे अंगण जणू मूक झाले. त्याचे लष्कर भरतीचे स्वप्नही हवेतच विरले.
 
तेजस विजय जाधव या युवकाचा 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी निर्घृण खून झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर आष्टे गावासह सारा नागठाणे परिसर सुन्न झाला. आष्टे हे पुनर्वसित गाव. सज्जनगडच्या पायथ्याशी असलेले हे गाव उरमोडी प्रकल्पात बाधित झाले. 2000 च्या सुमारास या गावाचे सातारा तालुक्‍यातच दोन ठिकाणी पुनर्वसन झाले. काही कुटुंबे शेळकेवाडी गावानजीक पुनर्वसित झाले. काही कुटुंबांना नागठाण्यालगत असलेल्या मळा वस्तीनजीक जागा मिळाली. तेजसचा जन्म नवीन गावातील. प्रारंभीचे प्राथमिक शिक्षण आष्टेतीलच प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर नागठाण्यातील श्रीरामकृष्ण विद्यालयात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो शेंद्रे येथे बारावीत शिकत होता. दीक्षा नावाची दहावीत असणारी बहीण, आई, वडील अन्‌ आजोबा असा त्याचा परिवार. तेजसला व्यायामाची, मैदानी खेळाची आवड होती. व्यायामासाठी त्याने नागठाण्यात जिम लावली होती. आष्टे ते नागठाणे हे जेमतेम अंतर. दुचाकीवरून तो नेहमी नागठाण्यात यायचा. रोज सकाळी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या मैदानावर धावण्याचा सराव करायचा. संध्याकाळी पुन्हा जिममध्ये व्यायाम करायचा. लष्करात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र, त्याच्या आयुष्याची अखेर दुर्दैवी ठरली. त्याचबरोबर त्याचे स्वप्नदेखील कायमचे विरून गेले. 

हेही वाचा : 25 लाखांसाठी अपहरण करुन केली हत्या, अडीच महिन्यानंतर सापडला मुलाचा मृतदेह....

तेजसचा नागठाणे परिसरातील गावांत मोठा मित्र परिवार होता. गेले दोन महिने सारेच मित्र त्याच्या वाटेकडे डोळे लावून होते. बारावीची परीक्षा सुरू असूनही काल त्याचे सारे मित्र उपस्थित होते. तेजसचा मृतदेह विहिरीतून काढण्यास रात्री खूप उशीर झाला, तरीही त्याचे मित्र घटनास्थळी थांबलेले होते.


तेजसवर अखेर अंत्यसंस्कार

नागठाणे (जि. सातारा) : आष्टे (पुनर्वसित, ता. सातारा) येथील तेजस जाधव याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा नागठाण्यातील स्मशानभूमीत तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करावी व खुनाचा तपास वरिष्ठ पातळीवर करावा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी तेजसचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 
सुमारे दोन महिन्यांपूर्वी तेजस जाधव याचे साहिल रुस्तम शिकलगार, आशिष बन्सी साळुंखे व शुभम ऊर्फ सोन्या संभाजी जाधव यांनी 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. अपहरणादिवशीच त्यांनी तेजसचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह नागठाणे- सोनापूर रस्त्याजवळील बामणकी नावाच्या शिवारातील विहिरीत सिमेंटच्या पाइपला बांधून टाकून दिला होता.

वाचा :  सातारा : नगराध्यक्षांसह सात जणांविरुद्ध सावकारीचा गुन्हा

या अपहरणाचा तपास करत असतानाच काही दिवसांपूर्वी त्याचे वडील विजय जाधव यांना खंडणी मागण्याचा फोन आल्यामुळे या खुनाचा तपास लावण्यात बोरगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या प्रकरणात नागठाण्यातील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल शिकलगार, आशिष साळुंखे व त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून तेजसचा मृतदेह पोलिसांनी पोलिस मित्र, शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्‍यू टीम, सातारा व त्रिशक्ती रेस्क्‍यू टीम, कऱ्हाड यांच्या सहकार्याने बाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे नागठाणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच त्याचे विच्छेदन केले.

हेही वाचा :  मला शुभेच्छाही नकाेत : उदयनराजे भाेसले

रात्री उशिरा पोलिसांनी तेजसचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. बोरगाव पोलिसांच्या तपासाबाबत शंका व्यक्त करत संतप्त ग्रामस्थांनी प्रथम मृतदेह संशयितांचा घरासमोरच दहन करण्याचा पवित्रा घेतला. या वेळी संशयितांना ताब्यात देण्याची मागणीही केली. पोलिस उपअधीक्षक आर. जे. साळुंखे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आष्टे गावचे पोलिस पाटील संतोष भोसले यांनी ग्रामस्थ व पोलिसांमध्ये समन्वय साधला. ग्रामस्थांनी संशयितांवर कडक कारवाई करावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तपासात लक्ष द्यावे, अशी मागणी केली. पोलिस उपअधीक्षक साळुंके यांनी कडक कारवाईचे आश्वासन देत मृतदेह ताब्यात घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. त्यानंतर रात्री उशिरा ग्रामस्थांनी तेजसचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर नागठाणे येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. दरम्यान, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तेजसच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.