बेळगावात 'या' 3 कारणांमुळे शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ

School
Schoolesakal
Updated on

बेळगाव : बेळगाव (Belguam) जिल्ह्यात तब्बल १ हजार २६५ शाळाबाह्य मुले आहेत. शिक्षण खात्याचा भाग असलेल्या समग्र शिक्षण अभियानच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. राज्यात ३४ हजार ४११ मुले शाळाबाह्य असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक शाळाबाह्य मुले बृहन् बंगळूर महापालिका हद्दीत आढळून आली आहेत. देशाची माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून बंगळूर शहर ओळखले जाते. पण याच शहरातील सर्वाधिक मुले शाळेपासून दूर असल्याचे धक्कादायक वास्तव सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Summary

संबंधित मुलांच्या पालकांना भेटून त्यांना शाळेत न पाठविण्यामागचे नेमके कारण शोधण्यास सांगण्यात आले आहे.

दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण खात्याकडून केले जाते. मार्च महिन्यातच या सर्वेक्षणाला सुरूवात झाली होती. यावेळी नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक व त्यानंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे हे सर्वेक्षण निर्धारीत वेळेत झाले नाही.

बेळगाव शहरात महापालिका कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण केले होते. पण बेळगावात शाळाबाह्य मुलांची संख्या खूपच कमी असल्याचा अहवाल त्यावेळी देण्यात आला होता. आता संपूर्ण राज्याचा अहवाल जाहीर करताना त्यात बेळगाव जिल्ह्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्याचा आकार पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे शाळाबाह्य मुलांची संख्या कमीच आहे.

शिक्षण खात्याकडून शाळाबाह्य मुलांची जी आकडेवारी जाहीर झाली आहे, त्यात शाळेत प्रवेशच न घेतलेल्या व शाळा अर्धवट सोडलेल्या मुलांची संख्या समाविष्ट आहे. कोरोना व लॉक डाऊनमुळे राज्यातील शाळा अनेक महिने बंद होत्या. या काळात अनेक कुटुंबाचे स्थलांतरही झाले. त्यामुळे अनेक मुलांची शाळा सुटली, काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखलच केले नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे. शिक्षण खात्याच्या सर्वेक्षणानुसार एवढी मुले मुख्य शैक्षणिक प्रवाहातून बाहेर राहण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण आर्थिक विवंचना ही आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले. याशिवाय आरोग्य व कौटुंबिक कारणांमुळेही मुले शाळेपासून वंचित राहिली आहेत.

शाळाबाह्य मुलांची माहिती जिल्हा व तालुका शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. संबंधित मुलांच्या पालकांना भेटून त्यांना शाळेत न पाठविण्यामागचे नेमके कारण शोधण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा अहवाल समग्र शिक्षण विभागाच्या राज्याच्या प्रकल्प संचालकाना पाठविला जाणार आहे. १४ ते १६ वयोगटातील मुलांचे प्रमाण यात जास्त आहे. त्यामुळेच शिक्षण खात्याने यावेळच्या सर्वेक्षणाचा अहवाल गांभिर्याने घेतला आहे.

शाळाबाह्य मुलांची आकडेवारी

बेळगाव-१२६५

बागलकोट-७६३

बळ्ळारी-१२७९

बंगळूर महापालिका-६६०८

बिदर-२६०९

चामराजनगर-४८१

चिकमंगळूर-५३४

चित्रदूर्ग-१५८७

मंगळूर-१९५

दावणगेरी-७९०

धारवाड-१४६३

गदग-५०५

हासन-७७२

गुलबर्गा-२१२९

रायचूर-१९६६

उडपी-१७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.