निवडणूक आहे, पण मतदारच नाहीत

निवडणूक आहे, पण मतदारच नाहीत
Updated on

सोलापूर : समविचारी आघाडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात धुमाकूळ उडवून देणारे आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार संजय शिंदे संचालक असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या सहा महिन्यात या संघाची निवडणूक होणार आहे. निवडणूक आहे, परंतु मतदार नाहीत, अशीच स्थिती आता सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. 

कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकूळच्या माध्यमातून माजी खासदार धनंजय महाडीक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील सामना रंगण्याची शक्‍यता आहे. मल्टिस्टेट की सहकारी या मुद्यावर सुरू असलेला वाद येत्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून अधिक विकोपाला जाणार आहे. आमदार परिचारक आणि आमदार शिंदे यांनी सोलापूरच्या राजकारणात मैत्रीचे नवे पर्व निर्माण केले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस वगळता अन्य दहा तालुके कार्यक्षेत्र हे जिल्हा दूध संघाचे आहे. सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात सध्या 807 सहकारी दूध संस्था कार्यरत आहेत. 807 मध्ये 147 संस्था या माळशिरस तालुक्‍यातील आहेत. 

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे कार्यक्षेत्र असलेल्या दहा तालुक्‍यातील 660 एवढ्याच संस्था कार्यरत आहेत. 595 दूध सहकारी संस्था या अवसायनात घेण्यात आल्या आहेत. सहकार कायद्यातील दुरुस्तीमुळे मतदानासाठी सभासद निश्‍चित करताना क्रियाशील आणि अक्रियाशिल सभासद हे दोन घटक विचारात घेतले जातात. गेल्या पाच वर्षात सोलापूर जिल्हा दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, संघाच्या सर्वसाधारण सभेला हजर राहणाऱ्या संस्था याचा विचार केला तर येत्या निवडणुकीसाठी जिल्हा दूध संघाच्या बोटावर मोजण्या एवढ्या संस्था क्रियाशील सभासद म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा दूध संघाच्या येत्या निवडणुकीत मतदार मिळविण्यासाठी दूध संघाला आणि सोलापूर जिल्ह्यातील सहकारातील नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

आई कुपोषित, बालके गुटगुटीत... 
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि अर्थकारणात सोलापूर जिल्हा दूध संघ आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांचा वाटा मोठा राहिला आहे. आयुष्याच्या राजकारणाची सुरवात या दोन्ही संस्थांमधून करणारे अनेक नेते जिल्ह्याच्या राजकारणात गुटगुटीत झाले आहेत. या दोन्ही मातृसंस्था मात्र आज मरणासन्न अवस्थेत आहेत. आई कुपोषित आणि बालके गुटगुटीत अशीच स्थिती निर्माण झाली असून गुटगुटीत बालके कुपोषित आईसाठी काय मदत करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.