"त्या' संस्थेवर अखेर प्रशासक

"Finally, the administrators at that 'institution
"Finally, the administrators at that 'institution
Updated on

अल्पमतात आलेले संचालक मंडळ बरखास्त

पौर्णिमा सुर्वे यांनी स्वीकारली प्रशासकपदाची सूत्रे 

-पतसंस्थेच्या मानद सचिवपदाचा वाद ठरला कळीचा मुद्दा 
-आर्थिक मतभेदातून वर्षभरात सहा संचालकांचे राजीनामे 
-अल्पमतातील संचालक मंडळाच्या उपविधी दुरुस्त्यांना चाप 

नगर : आर्थिक व्यवहारांमधील मतभेदांमुळे निम्म्यापेक्षा अधिक संचालकांनी राजीनामे दिले. त्यानंतरही अल्पमतात आलेल्या नगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मानद सचिवपदच रद्द करण्यासह अनेक नियमबाह्य ठराव केले. त्याविषयी दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत, संचालक मंडळाने केलेले सर्वच ठराव रद्द करत, संचालक मंडळच बरखास्त करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सोमवारी (ता. 23) केली, तसेच पतसंस्थेवर सहकार अधिकारी पौर्णिमा सुर्वे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सुर्वे यांनी आज तातडीने प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली. 

प्रशासक नियुक्‍तीसंदर्भात संस्थेचे मानद सचिव प्रकाश कराळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद केला. राजीनामे दिलेले विरोधी संचालक रमेश कराळे, भाऊसाहेब हारदे, रामकृष्ण करडिले आदी या वेळी उपस्थित होते. पतसंस्थेवर मानद सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रकाश कराळे यांच्या अधिकारांवरून पदाधिकारी व संचालकांमध्ये मतभेद झाले. तेथूनच, बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळात उभी फूट पडली होती. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या आदेशाने सोमवारी (ता. 23) पदच्युत झालेले पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार ठुबे व उपाध्यक्ष सतीश इंगळे यांनीच मानद सचिव असलेल्या कराळे यांना सह्यांचे अधिकार देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप पतसंस्थेतून राजीनामा दिलेले संचालक रामकृष्ण करडिले, राजेंद्र म्हस्के, बाप्पासाहेब बोडखे, रमेश कराळे, भाऊसाहेब हारदे, छगनराव काळे, सोपानराव मुळे यांनी केला. कराळे यांना सह्यांचे अधिकार देण्याविषयी त्यांनी विशेष आग्रह धरला होता. तथापि, कराळे यांना कागदपत्रे दाखविण्यात विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांनी टाळाटाळ सुरूच ठेवल्याने, वरील सर्वच संचालकांनी पदांचे राजीनामे दिले होते. 

पदाधिकाऱ्यांना "कारणे दाखवा' नोटीस

दरम्यान, कराळे यांच्या मुद्द्यावर संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर सतरापैकी अवघे सात संचालक शिल्लक होते. त्यांनी संस्थेचा कारभार पुढे तसाच सुरू ठेवला. त्याशिवाय अल्पमतातील या संचालक मंडळाने गणपूर्ती नसतानादेखील अनेक ठराव केले. त्यात ज्या मुद्द्यावरून उभी फूट पडली, ते मानद सचिव कराळे यांचे हे पदच रद्द करण्याचा ठराव या अल्पमतातील संचालक मंडळाने केला. तसेच, गणपूर्ती नसतानादेखील दोन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती केली. त्यावरून संस्थेच्या काही सभासदांनीच जिल्हा उपनिबंधक आहेर यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला होता. त्याविषयी लेखी तक्रारदेखील केली. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी पदाधिकाऱ्यांना "कारणे दाखवा' नोटीस बजावली होती. 

जिल्हा उपनिबंधकांनी बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी त्या वेळी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी ही नोटीसच रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा उपनिबंधकांच्या या नोटिशीला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावत, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडेच भूमिका मांडण्याबाबत आदेश केले. उपरोक्त विषयाबाबत योग्य ते म्हणणे जिल्हा उपनिबंधक यांच्यासमोरच मांडा, असे आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बजावलेल्या नोटिशीला विद्यमान पदाधिकाऱ्यांनी खुलासेवजा उत्तर दिले होते. 

नोटीस व त्यावर दाखल केलेल्या खुलाशावर याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तीन व डिसेंबर महिन्यात दोन वेळा जिल्हा उपनिबंधक यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र, विरोधी संचालक व सभासदांनी दाखल केलेल्या तक्रारींबाबत विद्यमान पदाधिकारी अपेक्षित खुलासा सादर करू शकले नाहीत. त्यातच, संचालक मंडळाने केलेल्या दोन तज्ज्ञ संचालकांची नेमणूकदेखील वादग्रस्त ठरली. ही नेमणूक गणपूर्तीशिवाय करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी संचालक मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तशी अंतिम नोटीस तातडीने बजावत प्रशासकाची नियुक्ती केली. त्यावरूनच सहकार अधिकारी सुर्वे यांनी तातडीने प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली. 

-कार्यक्षेत्र : नगर जिल्हा 
-सभासद : 4503 
-ठेवी : 16.44 कोटी 
-शाखा : 6 
-कर्मचारी : 19 

-कर्जवाटप : 
वैयक्तिक कर्ज 93.94 लाख, 
व्यावसायिक कर्ज 30.00 लाख. 
ठेवतारण कर्ज 2 कोटी 2 लाख. 
वाहनतारण कर्ज 24 लाख 9 हजार. 
दैनंदिन कर्ज 11 लाख 67 हजार. 
सोनेतारण कर्ज 3 कोटी 52 लाख. 
सोनेतारण कॅश क्रेडिट 2 लाख 95 हजार. 
कॅश क्रेडिट 1 कोटी 14 लाख. 
स्थावर तारण 2 कोटी 92 लाख. 
एकूण 11 कोटी 25 लाख 35 हजार 

विजयकुमार ठुबे संचालकपदास ठरले होते अपात्र! 
जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने सोमवारी (ता. 23) पदावरून काढलेले जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार ठुबे हे संचालकपदासदेखील अपात्र आहेत, असा आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी 18 डिसेंबर 2015 रोजी दिला होता. ठुबे यांच्याविषयी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. त्यातील चौकशीत ठुबे हेच थकबाकीदार असल्याचे समोर आल्याने, त्यांना संचालकपदावर राहण्याचा अधिकारच नसल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ठुबे पुन्हा 2015-16 ते 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पतसंस्थेच्या बिनविरोध झालेल्या निवडीत संचालक झाले. त्याबाबत कोणीच तक्रार केली नसल्याने ठुबे यांना ही संधी मिळाली होती, अशी प्रतिक्रिया प्रकाश कराळे यांनी "सकाळ'ला दिली. 

चिंता करण्याचे कारण नाही..! 
नगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या काही संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले. त्यामुळे सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार संस्थेवर प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे. ठेवीदारांच्या ठेवीदेखील सुरक्षित आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी चिंता करण्याचे कारण नाही. लवकरच संस्थेची निवडणूक घेण्यात येईल. त्यातून पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळाकडे पदभार सोपविण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
-दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()