मिरज : नागरी वस्तीमधील ज्वालाग्रही पदार्थांच्या व्यवसायाचा आता सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मिरज येथील कुपवाड रस्त्यावर नुकत्याच घडलेल्या अॅसिड कारखान्यास लागलेल्या आगीनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्वालाग्रही ॲसिडचा व्यवसाय करणाऱ्या या कारखानदाराकडे अग्निशमन विभागाचा परवाना दुरच उलटपक्षी जो परवाना आहे तोही बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यासाठी केवळ दहा हजार रुपयांच्या दंडाच्या कारवाईमध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागाने समाधान मानले. पण केवळ महापालिका क्षेत्रातच नव्हे तर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातही स्फोटक आणि ज्वालाग्राही पदार्थांचे अनेक व्यवसाय आणि कारखाने लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्याबाबत प्रतिबंधक उपाय करणाऱ्या यंत्रणेचे याकडे लक्ष नाही. अनेक कडक कायदेशीर तरतुदी असूनही त्याचे पालन व्यावसायिक आणि उद्योजकांकडून होत नाही. सरकारी यंत्रणाही हे तपासण्याची फारशी तसदी घेत नाहीत.
एखाद्या दुर्घटनेनंतर केवळ काही काळ चर्चा होते आणि कालांतराने कडक उपाययोजनांचा सर्वांना विसर पडतो. शहरात बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर रिफिल करणाऱ्यापासून ते खेड्यापाड्यात खोदाईसाठी जिलेटिनच्या कांड्या सांभाळणारे हजारो व्यवसायिक बेमालूमपणे स्फोटके आणि ज्वालाग्रही वस्तूंचा व्यापार व्यवसाय बिनदिक्कतपणे करत आहेत. यापूर्वीही खेड्यांमधील स्फोटांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे आता गरज आहे ती नागरिकांनी सजग आणि सतर्क राहण्याची. आपल्या परिसरातील अशा धोकादायक व्यवसायाबाबत किमान यंत्रणेस माहिती देणे अथवा त्याबाबत संबंधित व्यवसायाच्या व्यवसाय मालकाला अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात भाग पाडणे एवढे तरी आपणही निश्चितपणे करू शकतो.
जिल्ह्यातील ज्वालाग्रही वस्तूंच्या व्यवसायांचा आढावा
अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत जागृती
शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अग्निप्रतिबंधक प्रशिक्षण
स्फोटकांच्या बेकायदेशीर व्यवसायाबाबत कठोर कारवाई
स्फोटके व्यवसायाबाबत तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा
स्फोटक आणि ज्वालाग्रही पदार्थांची साठवणूक आणि व्यवसायाबाबत कार्यक्षेत्रातील सर्व बीट अंमलदारांकडून तातडीने आढावा घेणार आहोत. ज्यांच्याकडे परवाने आणि प्रतिबंधक यंत्रणा नसतील त्यांचे व्यवसाय तातडीने बंद केले जातील.
- अशोक विरकर पोलिस उपाधीक्षक, मिरज
दुर्घटनेवेळी तातडीने आग आटोक्यात आणणे याला आम्हाला प्राधान्य द्यावे लागते. परंतु उद्योग व्यवसायांच्या परवाने आणि अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी महापालिकेसह सर्वच नगरपालिका आणि तालुका स्तरावरही स्वतंत्र यंत्रणेची नितांत गरज आहे.
- विजय पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.