सांगली : शेती पंपाची वीज बिले दुरुस्तीसाठी वीज ग्राहक संघटनेच्यावतीने राज्यव्यापी अभियान सुरु करण्यात आले आहे. येत्या एक जानेवारीला कुपवाड रस्त्यावरील माळी मंगल कार्यालयात मेळावा आहे. वीज ग्राहक शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे. शासनाने थकबाकी पन्नास टक्के माफ करण्याची योजना राबवली आहे. मुळात बीलेच वाढीव दिली असल्याने ग्राहकांनी आधी बिले दुरुस्त करून घेतली पाहिजेत. त्यानंतरच या योजनेचा खरा लाभ मिळणार असल्याचे राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
ते म्हणाले,‘‘ सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत पन्नास टक्के रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच पन्नास टक्के सवलत योजनेचा लाभ होणार आहे. ही योजना राबविताना मंत्र्यांनी बिले आधी तपासून थकबाकी चूकीची असल्यास दुरुस्त केली जातील असेही सांगितले आहे. आता बिले वीज कंपनी स्वतःहून दुरुस्त करणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावे लागतील. ही योजना खऱ्या अर्थाने अंमलात यायची झाल्यास नव्वद टक्केहून अधिक बिलांबाबत असलेला चुकीच्या थकबाकीचा घोळ आधी मिटवला पाहिजे. कारण २०११-१२ पासून मीटर रिंडिग न पाहताच बिले देण्यात आली आहेत सरासरी वापर गृहित धरून शंभर ते सव्वाशे युनीट आकारणी केली आहे. पंपाचा जोडभार वाढवला आहे. अनेक मागण्याही शेतकऱ्यांच्या प्रलंबित आहेत. वीज बिलाच्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन तक्रारी करणे गरजेचे आहे. त्यामळे ग्राहकांनी जागरुकपणे ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. त्यानंतर स्थळ तपासणी होणार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहून वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली पाहिजे. अशा तक्रारी नोंद करण्यासाठी संघटनेच्यावतीने माहिती कक्ष सुरु केला आहे. त्याचाही लाभ घ्यावा.’’
अशी करा तक्रार
महावितरणच्या संकेतस्थळावर कृषि पंप वीज धोरण या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर लिंक खुली होईल. कृषी थकबाकी वसुली च्या खालील ग्राहक निहाय तपशील या ठिकाणी क्लिक केल्यानंतर येणाऱ्या तक्त्याममध्ये ग्राहक क्रमांक टाका त्यानंतर सध्याच्या बिलानुसार मिळआरी सवलत व भरावयाची रक्कम हा सर्व तपशील पुढे येतो.त्यानंतर शेवटी तक्रार नोंदवायची असल्यास नोंदवा असा पर्याय येतो. त्यावरील उपप्रकार निवडा हा पर्याय येईल. त्यामध्ये देयक, सरासरी देयक, मीटर वाचन दुरुस्ती व चुकीचा भार असे पर्याय येणार आहेत. वीज बिल चुकीचे व जास्त आहे अशा सर्व ग्राहकांनी योग्य पर्यायाची नोंद करणे आवश्यक आहे. अशी नोंद केली तरच बील दुरुस्त होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी होऊन बिले दुरुस्त होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.