हे पण वाचा - कोल्हापूर झेडपीत अखेर सत्तांतर, काॅंग्रेसने डाव जिंकला
दरम्यान, आंदोलक महिला आणि पोलिसांमध्ये बुधवारी सकाळी झटापट झाली होती. त्यात आंदोलक महिला आणि दोन पोलिस महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या होत्या. करवीरच्या तहसीलदारांसह प्रांताधिकारी यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, याप्रश्नी तीन दिवसात निर्णय न झाल्यास प्रसंगी अन्य ठिकाणी जलसमाधी घेऊ असा इशारा छत्रपती महिला आघाडीच्या प्रमुख दिव्या मगदूम यांनी बुधवारी दिला होता. आजही त्या आपल्या मागण्यांवर ठाम आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आंदोलकांशी चर्चा करत नाहीत आणि कर्जमाफीचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मगदूम यांनी घेतली आहे.
हे पण वाचा - भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...
बुधवारी काय घडले?
सकाळी अकरा वाजता दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हजारावर महिला तावडे हॉटेल नजीक जमा झाल्या. तेथून त्या निगडेवाडी येथील पंचगंगा नदी घाटावर आल्या. मंगळवारी रात्रीच नदीमध्ये उपोषणासाठी उभारलेल्या मंडपाकडे त्या जमावाने जाऊ लागल्या. त्यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलक महिला व पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलक संतप्त झाले. आम्हाला आंदोलन करण्यापासून हटवू नका, न्यायमार्गाने आम्हाला आंदोलन करू द्या, अशी संतप्त भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केली. त्यावेळी पोलिस अधिकारी व दिव्या मगदूम यांच्यात चर्चा झाली. त्यात फक्त प्रातिनिधिक स्वरूपात वीस महिला मंडपामध्ये उपोषण करतील असे ठरले. रात्री उभारलेला मंडपाची अज्ञातानी नासधूस केली होती. त्याची पुन्हा उभारणी करण्यात आली आणि सायंकाळी पाच वाजता वीस महिला त्याठिकाणी बेमुदत उपोषणाला बसल्या. तीन दिवसामध्ये जर या आंदोलनाची दखल नाही घेतली तर जलसमाधी घेऊ, असा इशारा आंदोलक नेत्या दिव्या मगदूम यांनी दिला होता.
यावेळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर, गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, शिरोलीचे किरण भोसले, गोकुळ शिरगावचे सुशांत चव्हाण, मनीषा नारायणकर, अतुल कदम आदी पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनची टीम, महापालिका अग्निशमन दलाचे जवान बोटीसह हजर होते. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही तैनात होते.
|