हरितालिकेच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरींची प्रतिष्ठापना केली जाते. तो दिवस म्हणजेच गौरी आवाहन...गणरायाचे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आगमन होते, तर गौरींचे भाद्रपद शुक्ल सप्तमीला म्हणजेच गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी आगमन होते. गौरीला काही ठिकाणी लक्ष्मी वा महालक्ष्मी म्हटले जाते. त्याविषयी सांगत आहेत लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर.
भाद्रपद महिन्यातील गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी म्हटले जाते. प्राचीन कथा कादंबऱ्यांत त्या दोन गौरींचा उल्लेख आढळतो. ज्येष्ठा म्हणजे मोठी वा तिची आधी स्थापना केली जाते म्हणून तिला ज्येष्ठा म्हणतात. कनिष्ठा म्हणजे लहान. ती ज्येष्ठा गौरीनंतर येते म्हणून कनिष्ठा. भारतीय संस्कृतीकोषात याविषयीची एक कथा आहे. ज्येष्ठ राजांची पत्नी ज्येष्ठा, कनिष्ठा यातील एक शुभकारक असते, तर एक अशुभकारक. मात्र, त्यालाही काहीही आधार नाही. गौरी ही भूदेवता, म्हणजे जमिनीची पूजा केली जाते. गौरीच्या पूजेमध्ये स्त्री रुपातील विविध मुखवटे असतात.