कागलमध्ये थोरल्याच्या लग्नात धाकट्यांच्या हळदीची धांदल

कागलमध्ये थोरल्याच्या लग्नात धाकट्यांच्या हळदीची धांदल
Updated on

हो नाही करत करत एकदाची राज्यात भाजप शिवसेना या पक्षांची लोकसभेसह विधानसभेसाठी युती झाली आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारीसुद्धा जाहीर झाली आहे; मात्र दोन्हीही घाटगे गटाचे उतावीळ कार्यकर्ते विधानसभेचे तीर व्हॉट्‌स ॲपच्या नथीतून मारताना दिसत आहेत. त्यामुळे कागलमध्ये थोरल्याच्या लग्नात धाकट्यांच्या हळदीची धांदल, असा प्रकार अनुभवावयास मिळत आहे.

अडीच वर्षांपूर्वी भाजपावासी झालेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचे कार्यकर्ते युती होताना कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण आणि इचलकरंजी या दोन विद्यमान जागांसह कागल व चंदगड अशा चार जागा भाजपला सोडण्यात आल्याचे सांगत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पक्षात प्रवेश करविणारे भाजपचे राज्यातील दोन नंबरचे मंत्री म्हणून ओळखले जाणारे महसूल व पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कागलमध्ये घाटगे यांच्याकडून आयोजित ज्या ज्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.

त्या प्रत्येक वेळी त्यांनी ते पुढच्या वेळी आमदार नक्की असतील आणि त्याचे सारथ्य आपण स्वतः करू अशी घोषणा केली. त्यामुळे या गटाच्या कार्यकर्त्यांना नेहमीच स्फुरण चढत गेले आहे. त्यामुळे ते या जागेवर आपल्याच नेत्याची निवड होणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगताना तसे मेसेज व्हॉट्‌स ॲपवर टाकताना दिसत आहेत. 

दुसरीकडे गेले काही दिवस ‘वेट अँड वॉच’ अशा सावध पवित्र्यात असलेले माजी आमदार संजय घाटगे यांनीही आता लोकसभेत कोल्हापूरचा भगवा फडकविण्यासाठी जीवाचे रान करू, असे जाहीर करून रणभूमीत ‘एंट्री’ केली आहे. ही जागा नैसर्गिकरित्या शिवसेनेचीच आहे.

गेल्या वेळी त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला आहे. तसेच शिवसेनेकडे संजय घाटगे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अंबरिश घाटगे असे दोघेही उमेदवार आहेत. वडील की मुलगा हा वाद नाही तर तो विषय आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडून आपल्याच नेत्याला मिळणार. अशा समर्थनाचे मेसेज या गटाचे कार्यकर्ते टाकताना दिसत आहेत. 

एकंदरीत विधानसभेपर्यंत ही युती अभेद्य राहिल्यास दोन्ही पैकी एकाच घाटगे यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे दुसरे घाटगे काय भूमिका घेतात हा प्रश्‍न आहे. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यातील हे व्हॉट्‌स ॲप वरील शाब्दिक युद्ध तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरले आहे.

निवडणुकीआधीच रणधुमाळी 
कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेवरून शाब्दिक युद्ध सुरू आहे. या जागेसाठी इच्छुक असलेले दोन्ही घाटगे आपण उमेदवारीचे दावेदार असल्याचे जोरदार समर्थन आपआपल्या व्यासपीठावरून करीत आहेत. त्यामुळे सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेवेळी कागलमध्ये निवडणुकीआधीच उमेदवारीच्या रणधुमाळीचा धुरळा उडणार. हे नक्की ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.