Gramsevak Agitation : ग्रामसेवक आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार

ग्रामसेवक संघ, युनियनचे पंचायत समितीसमोर धरणे.
Rupees
Rupeessakal
Updated on

सांगली - मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ ग्रामसेवक संघ आणि ग्रामसेवक युनियनने सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाची तीव्रता उद्या (ता. १५) वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच न्याय न मिळाल्यास आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाच्या अनुषंगाने दोन्ही संघटनांची एकत्रित ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा झाली. उद्या सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा कार्यकारिणी जिल्हा प्रशासनाला भेटून निवेदन देणार आहे.

सर्व तालुक्यांतील सभासद, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. तसेच पंचायत समितीसमोर धरणे धरणार आहेत. ग्रामपंचायतीमधील शिक्के, किल्ली व ‘डीएससी’ तालुकाध्यक्षांकडे जमा करून त्यांच्यामार्फत पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असल्याने सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना सभासदांना देण्यात आली आहे.

तसेच अन्यायाबाबत न्याय न मिळाल्यास आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरज पंचायत समितीसमोरील ग्रामसेवक संवर्गाच्या बदनामीचे आंदोलन हटणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचेही या बैठकीत ठरले. यावेळी राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रवीण देसाई, दोन्ही कार्यकारिणीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

‘लाडकी बहीण’च्या कामावर परिणाम

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे काही दाखले ग्रामपंचायतीमधून दिले जातात. मात्र, ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे महिलांना दाखले मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ग्रामसेवकांचे शिक्के, किल्ली आणि डीएससी गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केले जाणार असल्याने आणि ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित नसल्याने या योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.