शारीरिक क्षमता, इतर आजार, वाढते वय, व्यायामाचे प्रकार आणि तज्ज्ञ प्रशिक्षक यादेखील गोष्टींचा विचार आवश्यक बनला आहे.
सांगली : शहरातील एका जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन डॉ. अशोक धोंडे यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. डॉक्टरांचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. यापूर्वीही जिममध्ये व्यायाम करताना ॲटॅक येऊन मृत्यू झाल्याची मोजकी उदाहरणे आहेत. त्यामुळे जिममध्ये जरा जपूनच, असा सल्ला तज्ज्ञमंडळी देत आहेत...
सांगलीमध्ये जिममध्ये व्यायाम करताना राजू जाधव या उमद्या कार्यकर्त्याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. पाठोपाठ २०११ मध्ये बाजार समितीतील विकास वांगीकर यांचा व्यायाम करताना हृदयावर ताण येऊन मृत्यू झाला. २०१५ मध्ये कॉलेज कॉर्नरला एका जिममध्ये व्यायाम करताना पहिल्याच दिवशी सुनील चंदूलाल शहा या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. धोंडे यांचा नुकताच जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला.
डॉक्टरांना कोणतेही व्यसन नव्हते. व्यायामाची आवड असल्यामुळे ते नियमितपणे जिममध्ये येत होते. व्यायाम झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रशिक्षकांनी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करत जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांसारख्या जागरूक व्यक्तीचा जिममध्ये मृत्यू झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे. तसेच यामागील कारणांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे जिममध्ये जरा जपूनच व्यायाम आवश्यक आहे. तसेच शारीरिक क्षमता, इतर आजार, वाढते वय, व्यायामाचे प्रकार आणि तज्ज्ञ प्रशिक्षक यादेखील गोष्टींचा विचार आवश्यक बनला आहे.
जिममध्ये मेडिकल हिस्ट्री तपासणे सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. हृदयविकारास केवळ कोलेस्टेरॉलच कारणीभूत नाही, तर सी रिॲक्टिव्ह प्रोटिन्सचे प्रमाण वाढणेही धोकादायक आहे. त्यामुळे इतर घटकही कारणीभूत आहेत. व्यायामदेखील टप्प्याटप्प्याने वाढवला पाहिजे. व्यायाम सुरू असताना आहारात बदलही आवश्यक आहे. सप्लिमेंटरी फूडची गरज असते. बरेच जण व्यायाम सुरू असताना आहारात बदल करत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
- प्रणत पाटील, पर्सनल ट्रेनर व आहारतज्ज्ञ
जिममध्ये येणाऱ्या प्रत्येकाने सर्व माहितीनिशी फॉर्म भरणे आवश्यक आहे. बऱ्याच जिममध्ये ती व्यवस्था आहे; परंतु त्यामध्ये माहिती नोंदवताना काही जणांना कमीपणा वाटतो. म्हणून ते माहिती लपवतात. पुढे त्रास होऊ लागला की मग या गोष्टी बाहेर येतात. जिममध्ये येण्यापूर्वी काही जण फॅमिली डॉक्टरचे पत्रही आणत नाहीत. ३५-४० व्या वर्षानंतर व्यायाम करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते. स्वत:च्या क्षमतेचा विचार करूनच पाऊल टाकावे.
- इनायत तेरदाळकर, जिम प्रशिक्षक
जिममध्ये घ्या काळजी
रिकाम्यापोटी व्यायाम टाळला पाहिजे. अर्धा तास अगोदर पोटात काहीतरी अन्न हवे
जिममध्ये व्यायाम करण्यापूर्वी पुरेशी झोप पाहिजे
ओढून-ताणून व्यायाम नको. समाधानाने व्यायाम आवश्यक आहे
पुरेशी विश्रांती आणि डाएटही महत्त्वाचे आहे
सोबत टॉवेल, पाणी किंवा एनर्जी ड्रिंक हवेच
व्यायामावेळी चित्त एकवटले पाहिजे. अन्य विचार डोक्यात नको
नव्याने जाताना डॉक्टर व प्रशिक्षकांचा सल्ला घ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.