सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातून व पुणे, लातूरहून मित्रासोबत दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. सागर बसवराज कपाळे (रा. गोदुताई विडी घरकूल, कुंभारी) असे या संशयित आरोपीचे नाव असून आगरखेड (ता. इंडी) येथील रमेश यलगोंडा कोळी हा त्याचा साथीदार आहे. मित्राच्या सोबतीने सागरने सोलापूर शहर-जिल्हा व लातूर, पुण्यातून महागड्या दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी दहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
हेही वाचाच...अरेच्चा...घरफोडीसाठी जावई यायचा सासरवाडीला
संशियत आरोपी सागर हा रंगराज नगर येथून जुना बोरामणी नाका येथे येणार असल्याची खबर सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश पोळ यांच्या पथकाला लागली. विविध ठिकाणच्या दहा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी बाजार समितीच्या मागील स्मशानभूमी येथे सापळा रचला. काही वेळाने आरोपी त्याठिकाणी पोहचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, अवंती नगर येथील इण्डेन गॅस एजन्सी कार्यालयाबाहेरुन काही दुचाकी चोरल्याचे कबूल केले. तसेच फौजदार चावडी, सदर बझार, विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही त्याने दुचाकी चोरल्याचे सांगितले. वळसंग, करमाळा, निलंगा, शिवाजी नगर (लातूर), भारती विद्यापीठ परिसर, चंदन नगर (पुणे) येथूनही महागड्या दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यातील पाच दुचाकी सागर याने स्वत:च्या घराजवळील झुडूपात लपविल्या होत्या तर चार दुचाकी रमेश कोळी याच्या घराजवळ आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून दहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. पाच लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असल्याचे पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचाच...हेही माहिती असू द्या...महापरीक्षा पोर्टलचे लेखापरीक्षण सुरु
या पथकाने केली कामगिरी
सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश पोळ यांच्या पथकातील अजित कुंभार, दिलीप नागटिळक, बाबर कोतवाल, संतोष फुटाणे, राकेश पाटील, जयसिंग भोई, शितल शिवशरण, विजयकुमार वाळके, संदीप जावळे, वसंत माने, सचिन बाबर, स्वप्नील कसगावडे, उमेश सावंत, समर्थ शेळवणे, गणेश शिंदे, अश्रुभान दुधाळ, विजय निंबाळकर, संजय काकडे, प्रफूल्ल गायकवाड यांनी ही विशेष कामगिरी केली.
|