'या' शहरात दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्यांची पंचाईत

'या' शहरात दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्यांची पंचाईत
Updated on

सोलापूर : दुचाकीवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य दुचाकीस्वारांच्या मागे बसलेल्या व्यक्‍तीनेही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुचाकी चालवणाऱ्याकडे हेल्मेट आहे, परंतु मागे बसलेल्या व्यक्‍तीकडे हेल्मेट नसल्यास संबंधित दुचाकीस्वाराचा परवाना निलंबित केला जाणार आहे. तत्पूर्वी, 500 रुपयांचा दंडही आकारला जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिला आहे. 

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन विभागाने निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार परिवहन आयुक्‍तांनी वाहतूक नियमांची व निकषांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. शाळेच्या बसला परिवहन विभागाकडून स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते. मात्र, परवानगी नसलेल्या वाहनांचा विद्यार्थी वाहतुकीसाठी वापर केल्यास संबंधित वाहनाचा व वाहनचालकांचा परवाना निलंबित केला जाणार आहे. दुसरीकडे बहुतांश विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात सोडायला पालक दुचाकीवर जातात. त्या मुलांसह पालकांच्या सुरक्षिततेसाठी दोघांकडेही हेल्मेट असणे बंधनकारक करण्यात आले, मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र समोर आले. दरम्यान, बहुतांश अपघातात दुचाकीस्वाराच्या तुलनेत मागे बसलेल्या व्यक्‍तीलाच जीव गमवावा लागल्याचेही दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर आता या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. 

परवानगी नसलेल्या वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक 
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी संबंधित वाहनांना स्वतंत्र परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी वाहनांतून परवाना नसताना सुरू असल्याची स्थिती आहे. शालेय परिवहन समितीला त्याची माहिती असतानाही त्यांनी त्याकडे काणाडोळा केल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर आता अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिला. 

आरटीओचा इशारा... 
■ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे स्वतंत्र परवाना बंधनकारक 
■ स्कूल बसचा ज्याकडे परवाना आहे, अशा वाहनातूनच विद्यार्थ्यांची व्हावी वाहतूक 
■ दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्‍तींकडेही हेल्मेट बंधनकारक : अन्यथा परवाना निलंबित 
■ शालेय परिवहन समितीने नियमित घ्याव्यात बैठका : अपघाताला समितीच राहणार जबाबदार 
■ मोबाईलवर बोलत स्कूल बस अथवा दुचाकी चालविणाऱ्यांचाही परवाना निलंबित होणार 
■ दुचाकीस्वाराकडे हेल्मेट आहे, परंतु मागे बसलेल्या व्यक्‍तीकडे नसल्यास द्यावा लागणार पाचशेचा दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.