Independence Day 2024 :
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात सन १८५७ मध्ये झालेल्या लोकक्रांतीने झाली असे मानले जाते. १८५७ ते १९४७ या ९० वर्षांत कितीतरी हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करून स्वातंत्र्यरूपी देवतेला आपल्या प्राणांचा अर्घ्य दिला. कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली. स्वातंत्र्यानंतर मोजक्याच व्यक्तींचा इतिहास लिहिला गेला. बहुसंख्य देशभक्त असे आहेत की, ज्यांच्याबद्दल कुठेही चर्चा देखील केली जात नाही.
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक देशभक्ताची स्वतःची कहानी आहे, एक वेगळी गाथा आहे, जुन्या आठवणी आहेत, दुःखद अनुभव आहेत. कित्येकांना कुटुंबापासून तर काहीना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. अनेक देशभक्तांना कित्येक दिवस उपाशी रहावे लागले. तुरुंगात असताना अनेकदा पाण्याबरोबर कोरडी भाकरी खावी लागली. कोणी विरोध केला तर त्याला चाबकाचे फटके मारले गेले, तर कोणाला अंधारकोठडीत टाकण्यात आले. पण हे सारे स्वातंत्र्यप्रेमी, इंग्रजांच्यापुढे कधी झुकले नाहीत.
स्वातंत्र्य चळवळीत जाती-धर्माचा भेदभाव नव्हता. गरीब-श्रीमंत, उच्च- नीच अशी भावना नव्हती. प्रत्येकाचे ध्येय एकच होते, 'आपल्याला देश स्वतंत्र करायचा आहे' आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे. आपण मरणार आहोत, आपण नाहीसे होऊ पण स्वातंत्र्या सोबतच राहू ! फासावर लटकविण्याची धमकी आणि बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आपल्या देशभक्तांना घाबरवू शकले नाहीत. तुरुंगाच्या भिंती त्यांना रोखू शकल्या नाहीत, साखळदंड त्यांना बांधू शकले नाहीत. दंडुका त्यांना चिरडून टाकू शकल्या नाहीत.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या देशभक्तांवर खूप लिखाण करण्यात आले; पण जैन समाजाच्या योगदानावर फारसे लिखाण केले गेले नाही. स्वातंत्र्यलढ्यात जैन अनुयायांनी उत्साहाने भाग घेतला. अनेक जैन हुतात्म्यांनी बलिदान देऊन स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला. अनेकांनी तुरुगात असताना यम-यातना भोगल्या. अनेक माता पुत्रप्रेमाला पारख्या झाल्या. कितीतरी बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. बाहेरून चळवळीला बळ देणाऱ्या आणि तुरुंगात डांबलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या लोकांचे देखील त्यावेळी मोठे योगदान होते.
पुरातन काळापासून जैन समाज हा धनिक आहे. त्यामुळे या समाजाने आजवर जेवढे आर्थिक योगदान दिले आहे तेवढे क्वचितच इतर कोणत्या समाजाने दिले असावे. भारतीय राज्यघटना आणि आझाद हिंद फौज यांच्या निर्मितीतही जैनांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वातंत्र्य चळवळीमध्ये जैन वृत्तपत्रे व मासिकांनीही महत्त्वाचे योगदान दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी मौलिक स्वरूपाचे योगदान दिले असले तरी जैन समाजातील क्रांतिकारकांनीही इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी असंख्य प्रयत्न केले व इंग्रजांना भारतातून निघून जाण्यास सांगितले. यामध्ये हुतात्मा मोतीचंद, आण्णासाहेब पत्रावळे, भूपाल अणुस्कुरे, स्वातंत्र्यवीर साताप्पा, बी. एस. पाटील या जैन स्वातंत्र्यसैनिकांची नावे घ्यावी लागतील.
अमर शहीद हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे हे त्यांपैकीच एक ! "शिक्षकानों नोकरी सोडा आणि देशाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारी कार्यात सहभागी व्हा. ब्रिटिशानों, इथून निघून जा अशी घोषणा करा आणि इंग्रजांना जाळून टाका" त्रैमासिक परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत काळ्या शाईच्या अक्षरांनी वरील मजकूर लिहून १९४२ च्या चळवळीत उडी घेतलेल्या अमर शहीद आण्णा साहेब पत्रावळे यांना आज आपण विसरलो; पण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांचे नाव सदैव अमर राहील. या आंदोलनात भारतमातेला सर्वस्व अर्पण करणारे आण्णासाहेब हे सच्चे शहीद झाले.
आण्णासाहेब यांचा जन्म दि. २२ नोव्हेंबर, १९२५ रोजी हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे झाला. बारशाच्या दिवशी मंगल वाद्यांचा निनाद सर्वत्र घुमत होता. सारी नगरी बाळाला आशीर्वाद देण्यासाठी वाड्यावर जमली होती. कुलदीपकाच्या आगमनाने आण्णासाहेबांचे जन्मदाते वडील एगमंद्राप्पा व्यंकप्पा देखील खूप आनंदी होते. चेहऱ्यावरील ते विलक्षण तेज, गोरापान रंग, पाणीदार डोळे, गुबगुबीत गाल, कपाळावर तीट आणि बाळसेदार बाळाला पाहताच सर्वांना त्याला उचलून घेण्याचा मोह आवरत नसे. सूर्यासारखा तो तेजस्वी बालक दिसामासाने वाढू लागला.
आण्णासाहेबांच्या वडिलांचे गाव सांगली ! कृष्णातीरावर वसलेल्या सुंदर अशा सांगली नगरीत हळुहळू आपणासाहेबांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. आण्णासाहेबांना जेव्हा पहिलीच्या वर्गात दाखल करण्यात आले तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळू लागले. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या उक्तीनुसार त्यांचे बुद्धिचातुर्य शिक्षकांना उमगले.
त्याकाळी अभ्यासासाठी पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांसाठी एकच पुस्तक असे. पाट्या प पेन्सिली ही फारशा नव्हत्या. त्यामुळे लिखाणावर फारसा भर नसे. सर्व भर पाठांतरावर होता. प्राथमिक शाळेत असताना गुरुजींनी शिकवि-लेली 'सृष्टीचे कौतुक' ही कविता त्यांना फार आवडायची. ते सदा-सर्वदा ती कविता गुणगुणत रहायचे. कवितेप्रमाणेच पावकी, निमकी औटकी हे मुलांना अवघड वाटणारे पाढेही आण्णासाहेबांनी उत्कृष्टपणे पाठ करून लक्षात ठेवले होते.
त्यांच्या प्रत्येक कामात आश्वासकता जाणवत असे. मातृभाषेवर त्यांचे नितांत प्रेम होते. आपले विचार सहजगत्या ते मित्रांच्या गळी उतरवत असत. दररोज व्यायाम करणे हा ही त्यांचा छंद होता. दैनंदिन व व्यायामामुळे त्यांचे शरीर कणखर, मजबूत व डौलदार बनले. गोरा रंग, सुदृढ बांधा, धारदार आवाज, चालण्यातील ऐट यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष छाप सर्वांवर पडत असे. वाचन हा तर त्यांचा ध्यास व श्वास होता.
१९३८ मध्ये आण्णासाहेब ७ वी पास झाले होते. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आप्णासाहेबांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेतले होते. त्यांना हायस्कूलची शिष्यवृत्ती मिळाली होती यावरून त्यांची अभ्यासातील गती लक्षात येते.
इंग्रजीच्या चौथ्या वर्गाची वार्षिक परीक्षा सुरू असताना देखील त्यांनी महात्मा गांधीजींच्या 'हरिजन' साप्ताहिकातून संग्रहित केलेल्या निवडक लेखांचे एक छोटेसे पुस्तकही वाचले. येथून आण्णासाहेबांच्या विचारांचे क्रांतीमध्ये परिवर्तन झाले. देश स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला. पुढच्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्रैमासिक परीक्षेच्या उत्तर-पत्रिकेमध्ये 'शिक्षकांनो, तुमची नोकरी सोडा....' हे वर दिलेले वाक्य शिक्षकांना उद्देशून लिहिल्यानंतर ते तेथून निघाले. शाळेला रामराम ठोकला आणि क्रांतिकारी यज्ञात उडी घेतली.
त्याकाळी स्वातंत्र्य चळवळीचे काम करणारे जे नेते होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे आण्णासाहेबांना योग्य ती दिशा मिळाली. सुरुवातीला माहितीपत्रके वाटणे, ती चिकटविणे, गावात होणाऱ्या सभेच्या वेळी तेथील व्यवस्था पाहणे, प्रभातफेऱ्या काढणे अशा कामातून आण्णासाहेबांना स्वातंत्र्य चळवळीचे बाळकडू मिळाले. प्रत्यक्षात छोटी, परंतु धाडसाची कामे चळवळीमध्ये करण्याची प्रेरणा त्यांना क्रांतिकारक देशभक्तांकडून मिळाली.
१९४२ मध्ये सांगली स्टेशन चौकातील सभेची ती घटना! सरकारने या सभेवर गोळीबार केला. अनेकजण जखमी झाले. जखमींची सेवा आणि त्यांच्या देखभालीचा मोठा भार कोण घेणार? हा यक्षप्रश्न सर्वांसमोर उभा होता. आण्णासाहेब पुढे आले आणि म्हणाले "हे काम आम्ही करू!" पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी ही गोष्ट पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली. तेव्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या वडिलांना गाठले आणि त्यांच्या वडिलांवर अनन्वित अत्याचार केले. त्यांना तडीपार करून त्यांचे घर आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या धमक्याही दिल्या. पण ज्यांनी भारतमातेच्या चरणी आपण आपले जीवन अर्पण केले आहे ते अशाप्रकारे दिलेल्या धमक्यांना घाबरतात का ? आण्णासाहेब घाबरले नाही, तर क्रांतिकारकांना उघडपणे पाठिंबा देऊ लागले. अगदी क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांमध्येही ते सहभागी होऊ लागले.
सांगलीच्या बुरूड गल्लीत एकदा क्रांतिकारकांची सभा सुरू होती. या बैठकीला आण्णासाहेबही उपस्थित होते. पोलिसांना कसातरी अचानक सुगावा लागला. मागोवा घेत घेत पोलीस तेथे पोहोचले. अचानक छापा टाकण्यात आला. क्रांतिकारकांना पकडण्यात आले आणि त्यांना सात महिन्यांची शिक्षा होऊन सांगलीच्या राजवाड्यामधील तुरुंगात डांबण्यात आले. त्याचवेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील कारागृहात होते. वसंतदादा यांच्या सोबत त्यांचे आणखी १४ सहकारी देखील त्या तुरुंगात होते व त्या सर्व सहकाऱ्यांचे प्रमुख नेतृत्व वसंतदादा पाटील यांचेकडे होते.
सांगलीच्या तुरुंगात असताना या सर्व कैद्यांना (वसंतरावदादा पाटील यांच्या सहकाऱ्यांना) वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. सांगलीच्या तुरुंगातून ब्रिटिश सरकार त्यांना सातारच्या तुरुंगात नेणार होते. त्यामुळे सांगलीतूनच आपली सुटका करून घ्यावी यासंबंधीचे विचार वसंतदादांच्या मनात घोळत होते.
२३ जून १९४३ चा तो दिवस ! तुरुंगातून सुटकेची योजना वसंतदादांना स्वस्थ बसू देईना. विचारचक्र सुरू झाले. त्यावेळी आण्णासाहेब पत्रावळे व बाबू जाधव हे लहान वयाचे कैदी असल्यामुळे त्यांना तुरुंगात कुठेही जाण्याची परवानगी होती. त्यांच्यामार्फत वसंतदादांचे सर्व निरोप दादांच्या सहकाऱ्यांना मिळायचे.
दादांच्या नेतृत्वाखाली जुलै १९४३ रोजी कैदेतील सर्वांनीच तुरुंगातून पळून जाण्याचा साहसी निर्णय घेतला. आण्णासाहेब यांच्याबरोबर कैद करण्यात आलेल्या अन्य क्रांतिकारकांच्या मना-लाही शांतता वाटत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत तुरुंगाबाहेर पडून क्रांतीची ज्योत त्यांना तेवत ठेवायची होती. पळून जाताना पकडले गेलो तर मृत्युशिवाय काही मिळणार नाही हे त्यांना माहीत होते; पण आपल्या मृत्युनंतर देश स्वतंत्र झाला तर आपल्या जन्माचे सार्थक होईल असे त्यांना वाटत होते.
२४ जुलै १९४३ च्या शनिवार दुपारी २.३० वाजता शौचालयात जाण्याचा बहाणा करून स्वातंत्र्य सैनिक हिंदुराव पाटील यांनी पहारेकऱ्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरवाजा उघडताच हिंदुरावांनी पोलिसाला धाक दाखवून त्यांची बंदुक हिसकावून घेतली. त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांनाही मुक्त केले. त्या सर्वांनी तुरुंगातील इतर पोलिसांच्याकडून आणखी काही बंदुका व काडतुसे मिळविली. वसंत-दादा, जयराम कुष्टे व अन्य काही सहकाऱ्यांनी प्रवेश- द्वारातून बाहेर पडायचे ठरवले होते.
आत सुरू झालेली गडबड ऐकून पुढील प्रवेशद्वार रखवालदाराने बंद केले. टेहळणीवर असलेल्या बुरुजावरील पोलिसांनी पळून जाणाऱ्या कैद्यांना पाहून गोळीबार सुरू केला. त्यामुळे खालून स्वातंत्र्य सैनिकांनी गोळीबार केला. सर्व सहकारी सुरक्षित बाहेर पडेपर्यंत हिंदुराव पाटील तटावर बंदुक घेऊन उभे राहिले. त्यांनी एकाही पोलिसाला तटाकडे येऊ दिले नाही. हिंदुराव पाटील उडी मारत असताना त्यांचा पाय घसरला व ते पळू शकले नाहीत. त्यांना अटक झाली. या मोहिमेत दुर्दैवाने काहीजण गाळात रुतले. पोलिसांनी गोळीबार सुरू केला. वसंतदादांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढे जाण्यास सांगितले. जयराम कुष्टे व गणपत कोळी दादांना म्हणाले, "दादा तुम्ही जा. आम्ही पोलिसांना थांबवतो?" दादा म्हणाले "आपल्यासोबत लहान मुलेही आहेत. लहान मुलांना बळी देऊन मला पुढे जावयाचे नाही. तुम्ही पुढे जा."
आपले सर्व सहकारी सुरक्षितरित्या तटाबाहेर पडेपर्यंत वसंतदादा जागचे हालले नाहीत. त्यावेळी वसंतदादांना गोळी लागली ते बेशुद्ध झाले. त्यांना अटक झाली. तटावरून उड्या मारल्यानंतर सर्व कैदी वाट मिळेल त्या दिशेने पळू लागले. त्यावेळी सर्वत्र गोंगाट सुरू झाला. पोलिसांनी क्रांतिकारकांच्या मागे धाव घेतली. कांतिकारकांपैकी काहींनी कृष्णा नदीच्या पाण्यात डुबकी घेतली तर काहींनी, सांगलवाडीकडे धाव घेतली. काहींनी हरिपूरकडे स्थलांतर केले, तर काहींनी वारणेतून पोहत जात कोथळी भागातील झाडावर चढून बसले. तेव्हा नावेतून येऊन पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व अटक करून पुन्हा सांगलीच्या तुरुंगात आणले, काही पळाले ते पळालेच.
आण्णासाहेबांना पोहायला येत नसल्याने ते समडोळीच्या दिशेने धावले. जुलै महिना आणि पावसाळ्याचे ते दिवस ! पावसामुळे सर्वत्र ओली माती ! आण्णासाहेबांचे पाय चिखलात रुतत असल्याने त्यांना पळतानाही खूप त्रास होत होता. अशावेळी अचानक मागून पोलिसांनी गोळी झाडली. आण्णासाहेब तत्क्षणी शहीद झाले. तो क्रूर दिवस होता दि. २४ जुलै, १९४३ चा ! मृत्युसमयी त्यांच्या तोंडून शब्द निघाले, 'वंदे मातरम् ।'
आजही सांगलीमध्ये आण्णासाहेबांच्या स्वांतत्र्य लढ्याची आठवण म्हणून हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे चौक उभारला आहे.
- श्रीमती शैलजा अ. निटवे, मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.