सत्ताधारी, NCP च्या राजकीय गोंधळात इस्लामपूरचाच ‘करेक्ट कार्यक्रम’

दहा वेळा विशेष सभा, मासिक सभांचा सपाटा
islampur muncipal carporation
islampur muncipal carporationesakal
Updated on

इस्लामपूर (सांगली) : इस्लामपूर (Islampur)नगरपालिकेचा कार्यकाल संपायला दहा दिवस बाकी आहेत. गेल्या पाच वर्षांत राजकारणाचा जो गोंधळ पाहिला, तो साऱ्या व्यवस्थेला लाजीरवाणा होता. विकास कामांबाबत ना सत्ताधाऱ्यांना, ना राष्ट्रवादीला सोयरसुतक दिसले. गेल्या आठ ते दहा सभा निव्वळ राजकीय तमाशा केला गेला. अशाने शहराचे वाटोळे व्हायचे थांबणार नाही. इस्लामपूरकर याला वैतागले आहेत. राजकीय गोंधळात इस्लामपूर शहराचा आणि इथल्या जनतेचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला, अशी संतप्त लोकभावना आहे. तो वैताग आता दिसू लागला आहे.

गेल्या पाच वर्षांत मागे वळून पाहताना श्रेयवादाच्या पलीकडे काही दिसत नाही. अडकलेली कामे सावळा गोंधळ चव्हाट्यावर मांडणारी आहेत. नगरपालिकेवर गेली तीस वर्षे जयंत पाटील (Jayant Patil) समर्थकांची सत्ता होती. तुल्यबळ विरोधकही होते, मात्र पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील गटाला बाजूला ठेवत शहरवासीयांनी विकास आघाडीला सत्तेचा कौल दिला. थेट नगराध्यक्षपद मिळाले. परंतु, दोन्ही गटांची सदस्य संख्या समान राहिली आणि गोंधळाला पोषक वातावरण तयार झाले. हमरीतुमरी, अंगावर धावून जाणे, एकमेकांची इज्जत काढणे यावर भर दिसला.

प्रारंभीच्या काळात विकास आघाडीने युती शासनाकडून भुयारी गटर योजनेला मंजुरी आणली. हा निधी आमचाच आहे, असा दावा दोन्ही गटांकडून केला गेला. श्रेयवाद सुरू झाला. प्रत्येक सभा कायद्यावर बोट ठेवत पंधरा-पंधरा तास चालली. वाटा-पळवाटा शोधून एकमेकांवर कडी केली गेली. हा विरोध कमी होईल, विकासावर चर्चा होईल, ही अपेक्षा फोल ठरत गेली. भुयारी गटर योजना सुरू झाली. सुरवातीपासूनच काहीतरी त्रुटी काढून त्याला राष्ट्रवादीचा विरोध, नंतर सत्ताधाऱ्यांमधील शिवसेनेचा विरोध सुरू झाला. शहरातील अंडरग्राऊंड पाईपलाईनचे काम अडखळत अवघे ३० टक्के झाले. त्यानंतर मलनिस्सारण केंद्राच्या जागेवरून संबंधित जागा मालक उच्च न्यायालयात गेले. काम थांबले. या दरम्यान उकरण्यात आलेल्या शहरातील सर्व रस्त्यांची वाट लागली.

या सर्व घडामोडीत साडे चार वर्षे संपली. कोरोनामुळे काम थांबले. गेल्यावर्षी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीने १५ कोटी निधी आणल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. त्या कामांना विशेष सभेतून मंजुरी देणे आवश्यक होते. ती सभाच प्रत्येक वेळेला काही ना काही अडथळ्यामुळे लांबत गेली. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत त्या कामांना मंजुरी नाही. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नगरसेवक आनंदराव पवार (Anandrao Pawar) यांच्या प्रयत्नातून ११ कोटी मंजूर झाल्याची माहिती स्वतः पवार व खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी दिली. हा निधी वापरण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेतही तेच घडले. तोपर्यंत निधीला राज्य शासनाकडून स्थगिती आली. परत आरोप- प्रत्यारोप सुरू झाले. सभा तहकूब झाल्या. हा निधी राष्ट्रवादीने अडवल्याचा आरोप शिवसेनेने केला.

गेल्या २० ते २५ दिवसांत आठ ते दहा वेळा विशेष सभा, मासिक सभांचा सपाटा लागला. मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनसमोर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. बरेच नाट्य घडले. हा नगरपालिकेच्या इतिहासातील काळा दिवस ठरावा. त्यानंतर दोन्ही सभांत गोंधळच झाला. गेल्या वर्षी १५ डिसेंबरला पुढे ढकलण्यात आलेल्या व त्यानंतर पाच वेळा तहकूब झालेल्या विशेष सभेचे आज आयोजन होते. येथेही तेच घडले. वीस विषयांच्या या सभेत फक्त ४ विषय घेण्यात आले. विकास आघाडीच्या नगरसेवकांनी दंडाला काळ्या फिती बांधल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी झाली. सभा तहकूब झाली.

इकडे लक्ष नाहीच

डेंग्यूची साथ, नादुरुस्त पाईपलाईन, अर्धवट भुयारी गटर योजना, रस्त्यांची दुर्दशा, आरोग्याचे प्रश्न याकडे कुणाचे लक्ष नाही. व्यापक शहर हिताचे निर्णय घेऊन व्यक्तिगत हेवेदावे व पक्षीय भांडण बाजूला ठेवून काम करा, असे सांगायची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीत जनता या साऱ्याचा हिशेब करेल, असेच वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.