जत नगरपरिषद वार्तापत्र : राष्ट्रवादी, भाजप नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर

Jat Nagar Parishad Newsletter : NCP, BJP corporator on the verge of split
Jat Nagar Parishad Newsletter : NCP, BJP corporator on the verge of split
Updated on

जत (जि. सांगली) : जत नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना आतापासूनच वेग आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपचे काही नगरसेवक पक्ष श्रेष्ठींवर नाराज होऊन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे पालिकेत कॉंग्रेसला रोखण्यासाठी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी कॉंग्रेस व आमदार सावंत यांना हिसका दाखविण्याचा मणसुबा जाहीर बोलून दाखवला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. 

नगरपरिषद विषय समिती निवडीत भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सभापती पदाची संधी मिळवली. मात्र, सभापती पदासाठी डावलल्याने भाजपचे नगरसेवक तथा गट नेते विजय ताड यांच्यासह आणखी दोघांनी नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे जवळपास मान्य केल्याचे वृत्त चर्चेत आहे.

याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका वनिता साळे यांनी विकासकामात आपल्याला डावलल्याने उघड उघड पक्ष श्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी तक्रारी अर्ज केला. शिवाय 9 नंबर वार्डाचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ टिमू ऐडके यांनीही पक्षाच्या विरोधात वेळोवेळी भूमिका घेऊन नेत्यांवर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोबत असतील की, कॉंग्रेसच्या सोबत राहणार, हे येणारा काळच ठरवेल. 


दरम्यान, वीर शिवा काशिद उद्यान भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात माजी आमदार विलासराव जगताप व बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी कॉंग्रेस व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याबद्दल असलेली मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली. शिवाय, येणाऱ्या पुढील कोणत्याही निवडणुकीत दोघे मिळून धडा शिकवू, असाही मनोदयही बोलून दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिंदे यांनी थेट आमदार सावंत यांना खुले आव्हानच दिले. त्यामुळे जतच्या राजकीय वर्तुळात कॉंग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप असे नवे समीकरण तयार झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत ही युती जतची जनता कितपत स्वीकारेल, हे नक्कीच पहावे लागेल. 

कॉंग्रेसची रणनीती काय? 
जत तालुक्‍यात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे. भले जत नगरपरिषदेत सत्तेत दोन्ही एकत्र असले, तरीही एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. वीर शिवा काशिद उद्यानाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदारांना डावलून झाला. यामुळे कॉंग्रेस नगराध्यक्षांसह नगरसेकांनी कार्यक्रमाला दांडी मारली. मात्र, याठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केली. त्यामुळे आता कॉंग्रेस पुढील काळात कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.