Crime News : ‘मर्द’मुळे चिकन्याच्या खुनाचा लागला छडा

‘तेरी मेरी यारी’ म्हणत कायम वावरणारे ‘ते’ दोघे. एकमेकांची संगत दीर्घकाळ राहिल्याने आपसूकच चांगल्या-वाईट सवयी लागल्या. मात्र हा दोस्ताना चिकन्याचा ‘काळ’ बनला.
murder
murdersakal
Updated on

‘तेरी मेरी यारी’ म्हणत कायम वावरणारे ‘ते’ दोघे. एकमेकांची संगत दीर्घकाळ राहिल्याने आपसूकच चांगल्या-वाईट सवयी लागल्या. मात्र हा दोस्ताना चिकन्याचा ‘काळ’ बनला. जमिनीत पुरलेल्या चिकन्याच्या खुनाचा छडा दंडावरील बदामात ‘मर्द’ लिहिलेल्या टॅटूमुळे लागला. एक क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यात ‘खाकी वर्दी’ पुन्हा यशस्वी झाली.

ही घटना आहे मे २०१६ ची. गुंड चिकन्या ऊर्फ धनराज धुतरगी (नांदणी रस्ता, जयसिंगपूर) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे त्याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. जयसिंगपूर बसस्थानक परिसरात त्याची गुंडगिरी चालायची.

१० मे २०१६ ला सायंकाळी साडेसहा वाजता त्याचे दोन मित्र पान टपरीसमोर थांबले होते. तेव्हा चिकन्या तेथे आला. दोघांकडे दारू मागू लागला. त्या दोघांनी नकार दिला. काही वेळानंतर चिकन्या पुन्हा आला आणि त्याने दोघांना शिवीगाळ केली. त्यातून जोरदार वादावादीही झाली. याची कायमची कटकट मिटवण्यासाठी दोघांनी खुनाचा कट रचला.

दुचाकीवरून अंकलीच्या दिशेने नेले. अंकली फाट्यावरून तिघेजण मिरजेजवळ कृष्णा नदीकाठावर मारुती मंदिराजवळ आले. तेवढ्यात चिकन्याला फोन आला होता. फोनवर बोलत असतानाच त्याच्‍या एका मित्राने मागून टॉवेलने चिकन्याचा गळा आवळला. त्यात चिकन्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तो मृतदेह पुरून टाकण्यासाठीचा प्लॅन दोघांनी बनवला.

त्याचा मृतदेह दुचाकीवर मध्यभागी घेऊन अंकली-मिरज रस्त्यावर डाव्या बाजूस निलजीच्या हद्दीतील एका शेताच्या चरीत टाकला. त्यावर माती टाकली. चेहरा ओळखू नये म्हणून दगड उचलून तोंडावर मारला. त्यानंतर दोघा मित्रांनी पळ काढला; परंतु चार दिवस उलटले तरी पोलिसांना खबर नव्हती. अखेर १४ मे रोजी एक मृतदेह शेतात असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा ओळखत नव्हता. दंडावरील बदामात ‘मर्द’ लिहिलेला टॅटू होता. त्या आधारे पोलिसांनी तपास करूनही दोन महिने छडा लागला नाही. दिवसेंदिवस हा तपास आणखी क्लिष्ट होत गेला.

तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुंडाविरोधी पथकाला या खुनाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांनी तातडीने पथक नियुक्त केले. पथकात सुनील भिसे, सागर लवटे, महेश आवळे, वैभव पाटील, योगेश खराडे, शंकर पाटील यांचा सहभाग होता. पथकाने आठवडाभर शोधमोहीम राबवली. त्यावेळी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार चिकन्या गायब असल्याचे समजले.

त्यावरून दोघा संशयितांनी त्याचा खून केल्याची माहिती खबऱ्यांकडून अंमलदार सागर लवटे यांना मिळाली. ३५ दिवसांनंतर ते दोघे संशयित पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी खुनाची कबुली दिली. मात्र, चिकन्याच्या दंडावरील तो टॅटू तपासाला दिशा देऊन गेला. या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावण्यात सांगलीतील जिगरबाज पोलिसांना यश आले. तत्कालीन अधीक्षक शिंदे यांनी पथकाचे कौतुक करत त्यांना पारितोषिकही जारी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.