Coronavirus : आता 'त्यांच्या' नातेवाईकांशी भेटीगाठी बंद

Coronavirus : आता 'त्यांच्या' नातेवाईकांशी भेटीगाठी बंद
Updated on

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा कारागृहातही विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असून, न्यायालयाच्या आदेशाने आजपासून कैद्यांना तारखांसाठी न्यायालयात नेणे बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर कैद्यांना बाहेरून येणाऱ्यांमुळे संसर्ग होऊ नये, यासाठी 31 मार्चपर्यंत कैद्यांच्या त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे शासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना बंदी, सर्व धार्मिक व सावर्जनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांचा ना हरकत दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. काही ठिकाणी जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयानेही तातडीच्या खटल्यांचीच कामे चालविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार न्यायालयांनीही पक्षकारांना बोलावून न्यायालयात गर्दी करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कैद्यांच्या सुनावणीबाबतही न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा कारागृहातून कैद्यांना विविध न्यायालयांत सुनावणीसाठी बाहेर नेणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आवश्‍यकतेनुसार कैद्यांची आता कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पाडली जाणार आहे.
 
कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी कारागृह अधीक्षक गो. के. राठोड यांनीही विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारागृहामध्ये स्वच्छता राहावी, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कशी काळजी घ्यावी, याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वच कैद्यांना माहिती देण्यात आली आहे. कैद्यांना हात धुण्यासाठी डेटॉलची उपलब्धता करण्यात आली आहे. त्याबरोबर त्यांच्या वापरासाठी मास्क तयार केले जात आहेत. लवकरच सर्व कैद्यांना वापरासाठी मास्क दिले जाणार आहेत. सर्व कारागृहातील कैद्यांची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दररोज तपासणी केली जात आहे. त्यात कैदी आजारी आढळल्यास त्यांना स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.

वाचा :  कसे काय बुवा...त्यांचे 200 रुपयांवर भागते

जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना भेटीसाठी वेळ देण्यात येते. सुटीचे दिवस वगळून अन्य दिवशी सकाळी नातेवाईकांची भेट होत असते. त्यासाठी जिल्ह्याच्या तसेच परजिल्ह्यात असलेले नातेवाईकही भेटीसाठी येत असतात. राज्याच्या विविध भागात सध्या कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. बाहेर येणाऱ्या एखाद्या नातेवाईकाला त्याची बाधा झालेली असू शकते. त्यामुळे त्याच्या माध्यमातून अन्य कैद्यांपर्यंत या आजाराचे विषाणू पोचू शकतात. सर्वच कैदी धोक्‍यात येऊ नयेत यासाठी कारागृह प्रशासनाने कैद्यांना या धोक्‍याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या संमतीने नातेवाईकांची भेट 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबत कैद्यांच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाकडून आलेल्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालयानेही कामकाजाची साडेअकरा ते अडीच अशी वेळ केली आहे. त्याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी सम तारखेला निम्मे व विषम तारखेला निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले आहे. न्यायालयातही जामिनाची व अतितातडीची प्रकरणे चालणार आहेत. 
 
""कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत मध्यवर्ती कारागृहाप्रमाणे सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. स्वच्छता, वैद्यकीय तपासणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. डेटॉल व मास्कची उपलब्धता करण्यात येत आहे. सर्व कैदी सुरक्षित राहतील, यासाठी रुग्णालय प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच नातेवाईक भेट व सुनावणीसाठी बाहेर नेणे बंद करण्यात आले आहे.'' 
गो. के. राठोड, कारागृह अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.