सज्जनगड : कल्याण स्वामींच्या स्मारकातून मिळणार निष्ठेची प्रेरणा

सज्जनगड : कल्याण स्वामींच्या स्मारकातून मिळणार निष्ठेची प्रेरणा
Updated on

सातारा ः जोराच्या वाऱ्याने उडालेली समर्थ रामदास स्वामी यांच्या अंगावरील छाटी (वस्त्र) कड्यावरून उडी मारून अलगद आणून देणाऱ्या पट्टशिष्य कल्याण स्वामींच्या या उडीचे दिमाखदार स्मारक आता सज्जनगडाच्या कड्यावर उभे राहणार आहे. दरम्यान, हे स्मारक नागरिकांना गुरुभक्तीची प्रेरणा देत राहील, असा विश्‍वास सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा : वाईकरांचा रायरेश्वरावर जागता पहारा
 
साताऱ्याच्या पश्‍चिमेस सुमारे 18 किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तेथे तपश्‍चर्या केली होती. राममंदिरही उभारले आहे, तसेच समर्थ रामदास स्वामी यांची गडावरच समाधी आहे. भारत भ्रमण करून आल्यानंतर समर्थांचा अधिवास सज्जनगडावर बराच काळ होता. समर्थांचा शिष्यगणही मोठा होता. त्यामध्ये कल्याण स्वामी हे त्यांचे पट्टशिष्य होते. कल्याण स्वामी यांची श्रीराम आणि समर्थांवरील निष्ठेच्या, भक्तीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

समर्थ हे एकदा सज्जनगडाच्या एका कड्याच्या टोकावर बसले होते. त्या वेळी जोराचा वारा सुटला आणि समर्थांच्या अंगावरील वस्त्र उडून गेले. ते वस्त्र गडाच्या खालील दरीत जाऊ लागले. जवळच असलेल्या कल्याण स्वामी यांना समर्थांनी ते लक्षात आणून देताच कल्याण स्वामी यांनी कड्यावरून दरीत उडी मारली व वस्त्र समर्थांना आणून दिले. अशी आख्यायिका सांगितली जाते.

हेही वाचा : अन् वर्गमित्र धावून आले पवार कुटुंबियांच्या मदतीला

ही घटना सन 1676 ते 1682 च्या दरम्यान घडली असावी, अशी माहिती बाळासाहेब स्वामी यांनी दिली. या ऐतिहासिक उडीच्या ठिकाणी सज्जनगडाच्या एका कड्याच्या टोकाला चौथरा उभारण्यात आला आहे. तेच उडीचे स्मारक आहे. आता याठिकाणी आकर्षक आणि मजबूत असे स्मारक उभारण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. आता त्या चौथऱ्याच्या ठिकाणी सुमारे दहा लाख रुपये खर्च करून आकर्षक स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी खास दगड घडविण्याचे काम कोल्हापूर येथे कलाकार करत आहेत, अशी माहिती बाळासाहेब स्वामी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.