कर्नाटकने हिप्परगी बंधाऱ्यातील केलेल्या सुमारे सहा टीएमसी पाण्याची फूग ऐन उन्हाळ्यातही महाराष्ट्राच्या राजापूर बंधाऱ्यापर्यंत येते.
सांगली : कृष्णेच्या महापूराबाबत (Krishna River Flood) महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांतील धरणांमधील पाणी साठा व विसर्गाबाबत समन्वय व माहितीची देवाणघेवाण गरजेची आहे. त्यासाठी यावर्षी काटेकोर दक्षता घेऊ अशी ग्वाही अलमट्टी (कर्नाटक) येथे झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या (Krishna Flood Control Action Committee) पदाधिकाऱ्यांनी सोमवारी या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी कर्नाटकच्या कृष्णा भाग्य जलनिगम अंतर्गत अलमट्टी धरण मंडलाचे प्रभारी अधीक्षक अभियंता रमनगौडा हुन्नूर, ‘अलमट्टी’ धरणाचे (Almatti Dam) नोडल अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी, सहायक कार्यकारी अभियंता रवीचंद्र गिरी, आदी अधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला.
महापूर समितीचे पदाधिकारी विजयकुमार दिवाण, निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, दिनकर पवार, प्रदिप वायचळ, अभियंता सुयोग हावळ, सुशांत निकम, सचिन सगरे आदी सहभागी झाले. या सर्वांनी कर्नाटकच्या हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील सध्यस्थितीची पाहणी केली. स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सन २०२१ पासून समितीने सांगली परिसरात केलेल्या कामाची माहिती दिली. समितीने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या अहवालात केलेल्या सूचना शिफारशींची माहिती दिली.
त्यात प्रामुख्याने कर्नाटकने हिप्परगी बंधाऱ्यातील केलेल्या सुमारे सहा टीएमसी पाण्याची फूग ऐन उन्हाळ्यातही महाराष्ट्राच्या राजापूर बंधाऱ्यापर्यंत येते. हीच परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात नद्या तुडुंब भरतात तेव्हा राजापूर बंधाऱ्यात साचणाऱ्या पाण्याची फूग कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमध्ये दिसते. त्याचा परिणाम कृष्णा नदीच्या विसर्गावर होतो. हीच परिस्थिती अलमट्टी धरणाबाबतही होते. या धरणात पावसाळ्याच्या प्रारंभपासून पाणी साठा केला जातो. त्याचा एकूण परिणाम कृष्णेतील विसर्गावर होतो. त्यामुळे केंद्रीय जल आयोगाच्या धरण परिचलनच्या धोरणानुसार पावसाळ्याच्या प्रारंभपासून धरणातील पाणीसाठा ठेवावा, अशी आग्रही मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी प्रभारी अधीक्षक अभियंता हालूर व नोडल अधिकारी कुलकर्णी यांनी दोन्ही राज्यांनी पावसाळ्यात कृष्णा विसर्गबाबत समन्वय ठेवला पाहिजे यावर सहमती दर्शवली. ते म्हणाले, ‘‘२०१९ मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीस धरणांमधील पाणी विसर्गातील त्रुटी हे एक कारण आहे. मात्र, कमी काळात झालेली अतिवृष्टी हे महत्त्वाचे कारण आहे. हा निसर्ग आहे. मात्र, त्यानंतर दोन्ही राज्यांतील जलसंपदा विभागातील समन्वय चांगला असून २०२२ मध्ये या समन्वयामुळे महापूर टाळण्यात यश आले. नुकसान टळले. यंदाही गेल्या महिन्यात दोन्ही राज्यातील अधीक्षक स्तरावरील बैठक झाली आहे.’’
हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी साठ्याबाबत महाराष्ट्राने कृष्णा निरा निगमशी संवाद साधावा
रिअल टाईम डेटा ॲपबाबत कर्नाटकशी देवाणघेवाण व्हावी.
राजापूर बंधाऱ्यातून उन्हाळ्यात पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्राने सकारात्मक भूमिका घ्यावी.
धरण परिचलननुसार पाणीसाठ्यासाठी मंत्री स्तरावर निर्णयाची गरज.
दोन्ही राज्याच्या अधीक्षक अभियंत्यांची संयुक्त बैठक सांगली-अलमट्टीत घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.