खानापूर (जि. सांगली) : येथील नगरपंचायतची मासिक सभा झाल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सभेत विकासकामे करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरातुमरी, बाचाबाची झाली. यामुळे गेल्या चार वर्षांपासून शांत असलेले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सभेत सत्ताधारी गटाच्यावतीने तब्बल 28 विविध विकासकामे मंजूर करण्यात आली. यात नगरपंचायत इमारतीचे काम करण्यावरून गदारोळ झाला. यामुळे विरोधी गटाने वादग्रस्त जागेत होणारे इमारतीचे काम थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात 41 गुंठे जागा नगरपंचायतच्या ताब्यात आल्यानंतर इमारत बांधावी, असा उल्लेख केला आहे.
सत्ताधारी गटाचे याबाबत म्हणणे आहे की, 1152 आणि 1153 असे नगरपंचायत आवाराचे दोन गट आहेत. पैकी 1152 हा गट दहा गुंठ्यांचा असून, ही जागा नगरपंचायत मालकीची आहे; 1153 गट हा 28 गुंठ्यांचा असून या जागेच्या हक्काबाबत नगरपंचायतच्यावतीने विटा दिवाणी न्यायालय, अप्पर जिल्हाधिकारी सांगली, उपसंचालक भूमी अभिलेख पुणे या तीन ठिकाणी रितसर दावा सुरू आहे; तरी विरोधकांनी विकासकामांना खो घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांना काम थांबविण्याबाबत पत्र देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रशासकीय टोलेजंग इमारत बांधणार
खानापूर शहर फक्त नावासाठीच तालुका आहे. येथे एकही प्रशासकीय इमारत नाही. सध्या आम्ही युवा नेते सुहास (नाना) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनिल बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटी रुपये निधी सुसज्ज इमारतीसाठी मंजूर करून आणला आहे. मात्र विरोधक आमच्या कालावधीत इमारत होऊ नये. म्हणून जनतेची दिशाभूल करत काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही जनतेच्या सेवेसाठी लवकरच नगरपंचायतची प्रशासकीय टोलेजंग इमारत बांधणार आहे.
- तुषार मंडले, नगराध्यक्ष
काम थांबवण्याबाबत लेखी निवेदन
नगरपंचायतची इमारत होण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र नगरपंचायतीची 41 गुंठे जागा असताना संगनमताने अवघ्या दहा गुंठे जागेत इमारत बांधण्याचा सत्ताधारी गटाचा निर्णय आहे. याला आमचा विरोध आहे. 41 गुंठे जागा नगरपंचायतीच्या ताब्यात आल्यानंतर प्रशस्त इमारत बांधण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना कामाची चौकशी करण्याबाबत व काम थांबवण्याबाबत कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्या उपस्थित लेखी निवेदन दिले आहे.
- राजेंद्र माने, विरोधी पक्ष गटनेते
संपादन : युवराज यादव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.