फौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’...!

फौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’...!
Updated on

कोल्हापूर - घरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार? रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, हा इरादाही पक्का होता. अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि आजवरचा सारा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला. चिकुर्डे (ता. वाळवा) येथील अभिजित युवराज पवारची ही यशोगाथा.

चिकुर्डे हे वारणाकाठचे गाव. अभिजितचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नसल्याने आईने त्याला मामाकडे पाठवले. वारणा महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. मुळात तो हुशार. दहावीनंतर त्याला विज्ञान शाखेतही प्रवेश मिळाला असता; पण या शाखेचा खर्च परवडणार नाही, याची जाणीव असल्याने त्याने कला शाखेला प्रवेश घेतला.

सकाळी जनावरांसाठी शेतातून वैरण आणणे आणि त्यानंतर दिवसभर ग्रंथालयात तो अभ्यास करू लागला. घरी आल्यानंतर रात्री एकपर्यंत तो अभ्यासातच असायचा. ‘एमए’ होईपर्यंतचा सारा प्रवास त्याचा सायकलवरूनच सुरू होता. एकदा तर सायकल दुरुस्तीला पैसे नाहीत म्हणून त्याने खांद्यावर सायकल मारून घरी आणली होती. 

दरम्यान, राज्यस्तरीय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत सलग सात वर्षे हो विजेता ठरला. पेट्रोल पंप, वारणा दूध संघ, वाळूच्या ठेक्‍यावरही त्याने काम केले. ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या आईलाही तो मदत करायचा. मात्र शिक्षणाची कास सोडली नाही आणि अधिकारी होण्याचं स्वप्न कधीही विसरले नाही. पुढे गावातच त्याने अभ्यासिका सुरू केली. २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. थोडक्‍यात यश हुकले. मात्र पुन्हा तो नेटाने कामाला लागला आणि यश खेचून आणले. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, प्रदीप पांढरबळे आदींचे त्याला मार्गदर्शन मिळाले. 

ध्येय ठरवले आणि झपाटून कामाला लागलो. सलग अकरा तास अभ्यासाचे नियोजन केले. एकदा अपयश आले. मात्र पुन्हा नेटाने अभ्यास सुरू केला आणि यश खेचून आणले.
- अभिजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.