कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न समन्वयमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गाणे म्हटल्याने नवा वाद उफाळून आला आहे. मंत्री पाटील यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर "हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू' या गाण्याचे बोल म्हटल्याने सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी गायलेल्या गाण्याचा अर्थ "जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्येच,' असा असल्यामुळे मंत्री पाटील यांनी सीमाभागातील मराठी बांधवांचा अपमान केल्याची भावना विविध संघटनांमधून व्यक्त होत आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी बेळगावातील मराठी युवा संघटनेने केली आहे. गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत आळवले. सध्या कर्नाटकात विधानसभेच्या तोंडावर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठीच चंद्रकांत पाटील यांनी हे गीत गायल्याची चर्चा सीमाभागात सुरू आहे.
त्याचबरोबर मंदिराच्या उद्घाटनासाठी वेळ काढला. पण सीमाप्रश्नासाठी समिती नेत्यांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला चालना देण्यासाठी बेळगाव येण्यासाठी मंत्री पाटील यांनी वेळ काढला नाही, अशी टीकाही सीमावासीयांकडून होत आहे.
|