कोल्हापूरात शेतकऱ्यांचा महावितरणवर मोर्चा 

कोल्हापूरात शेतकऱ्यांचा महावितरणवर मोर्चा 
Updated on

कोल्हपूर - शेतीपंपांचे कनेक्‍शन, प्रलंबित प्रश्‍न, शेतीसाठी सकाळी बारा तास वीज द्यावी, चुकीचे भारनियमन, वाढीव वीजबिल, घरगुती व औद्योगिक संभाव्य वीजदरवाढ, शेतीपंपासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी आज(गुरुवारी) महावितरण कार्यालयावर धडक मारली.

`आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा`, `मुद्दा शेतकरी पंपाचा आमच्या हक्काचा`, `वीज बिल भरण्यात राज्यात आम्ही एक नंबर पण तुमच्या भोंगळ कारभाराने आमची मोडलीया कंबर`, `अहो सरकार, शेतकऱ्यांच्या उसावर टाकताय वीज बील दरवाढीचा बोजा, प्रामाणिकपणे बील भरल्याचीच देताय आम्हाला सजा`, `महावितरणचा दाबाय लागतोय खटका राज्य सरकारला घ्यायला लागतोय झटका`, `नादुरुस्त मीटर तुम्ही नाय बदलणार अन दुप्पट-तिप्पट बील आम्हाला लावणार हा सावकारी कारभार आता नाही चालणार` या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांबरोबर औद्योगिक ग्राहकांवर वीज दरवाढ लादणाऱ्या महावितरण कंपनीचीच फ्युज उडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्री पाटील यांनी केले. दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चास प्रारंभ झाला. 

महावितरण व सरकारच्या भोगळ कारभारा विरोधात शेतकरी व आैद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आम्ही सर्व रस्त्यावर आलो आहोत. 21 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला महावितरणे दिला आहे. मुळात कृषी पंपाच्या संदर्भातील वीज जोडणीचे 6000 प्रस्ताव एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रलंबित आहेत. राज्य शासनाचा सगळा पैसा विदर्भाकडे चालला आहे पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. घरगुती वीज बिलामध्येही दहा-बारा टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. या अशा या भोगंळ कारभाराविरोधात आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता वेळ आली आहे शासनाला झटका देण्याची शाॅक देण्याची शासनाची फ्युज मोर्चाच्या माध्यमातून काढण्याची वेळ आली आहे
- सतेज पाटील,
आमदार

यावेळी श्री पाटील यांनी या मोर्चाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, महावितरण कंपनीने एका वर्षात तीन वेळा वीजदरात वाढ केली आहे. ही अन्यायी वीजदरवाढ 274 टक्‍के आहे. पुढे टप्प्याटप्प्याने यात वाढ होणार असून एप्रिल 2019 पर्यंत कृषी पंपाचा वीजदर दुप्पट, तिप्पट होणार आहे. आयोगाने लागू केलेल्या दरातील वाढीची संपूर्ण रक्‍कम कृषी पंपधारक शेतकऱ्यांना भरावी लागेल असे महावितरणने स्पष्ट केले आहे. ही वीज दरवाढ शेतकरी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांना परवडणारी नाही. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून त्यातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे. 2014-15 पासून कृषीपंपाना नवीन वीज कनेक्‍शन दिलेले नाही. त्यामुळे पाणी असूनही शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नवीन कृषी पंपानाही वीज कनेक्‍शन मिळत नाही. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचा हा खेळ मांडला आहे. याच्या विरोधात भविष्यात मोठे आंदोलन केले जाइल. मोर्चात यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.