कोल्हापूर : राजर्षी शाहूंची थोरवी जपणारा राधानगरीचा खेळोत्सव

शाहू छत्रपती महाराज केला तलावाचा आधार
राधानगरीत खेळोत्सवाची परंपरा आहे.
राधानगरीत खेळोत्सवाची परंपरा आहे.sakal
Updated on

शाहू छत्रपती महाराज केला तलावाचा आधार||

होरे नाव ठेवील हो

हो नाव ठेविला गा,

ठेविले लक्ष्मी तळे या राधानगरी जवळा||

असे हे बोल आणि घुमके आणि थाळीचा आवाज कानावर पडू लागला की समजायचं आपण राधानगरीमध्ये आहोत. होळी ते पाडव्यादरम्यान पडळी पैकी कासारवाडीमधे प्रत्येक घरातील पुरुष या एकाच कामात दंग होतो. त्याचे कारणही तसेच आहे.अहो राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला मान आहे तो. या मानाचा वारसा आजही हे लोक जपत आहेत. थोरामोठ्यांच्या तोंडचे हे बोल कोवळ्या वयापासून प्रत्येकाच्या कानी पडतात आणि ही रीत आणि मान पिढ्यान्‌पिढ्या पुढे सरकतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे काव्य रचले आहे.

राधानगरीत खेळोत्सवाची परंपरा आहे. या उत्सवात कासारवाडीच्या लोकांनी ‘सबिना’ सादर केल्याशिवाय उत्सवाला सुरुवात होत नाही. राधानगरीला जसा निसर्गाचा ठेवा लाभला आहे, तशीच ऐतिहासिक परंपराही लाभली आहे. येथे साजरा होणारा ‘खेळ’ हा उत्सव पारंपरिक बाज टिकवून आहे. गावातील तीन मंदिरांत वेगवेगळ्या दिवशी हा उत्सव उत्साहाने साजरा होतो. खेळे मंडळी रंगपंचमीपासून ‘तळी’ (वर्गणी) मागायला सुरुवात करतात.

पहिला खेळ राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या अंबाबाई मंदिरात साजरा होतो. उत्सवाला खरी रंगत रात्री ७ नंतर पालखी सोहळ्यासोबत येते. प्रथम मान मानकरी खेळे मंडळी देवीची पालखी घेऊन हत्तीमहाल येथील गाव सीमेवरील मंदिरात जातात. तेथून गावात परत येतात. गावातून वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात होते. या मिरवणुकीत पारंपरिक दिवट्यांचा प्रकाश, गावातील विविध मंडळाची लेझीम पथक आणि स्थानिक युवकांनी बैलगाडीचा उपयोग करून बनवलेला हत्ती हे मुख्य आकर्षण असते.

या हत्तीवर मानकरी मंडळी विराजमान होतात आणि हा हत्ती युवक पळवतात. त्या पाठीमागे कोंकणी संस्कृतीचा जाणीव करून देणारा सबिना वाद्यवृंद असतो. त्यामध्ये मोठाले मातीचे माठ घेऊन त्याचे वाद्य म्हणून उपयोग करतात. या माठावर चामड्याचे पान चढवून त्याचा वापर केला जातो. तसेच मोठ्या चकत्या (मोठे झांज) यांच्या स्वर मिलाफाने श्रवणीय लोकगीतांचे आणि नृत्याचे सादरीकरण होते. या गीतामध्ये पौराणिक कथापासून राजर्षी शाहू महाराजांच्या तसेच राजघराण्याचा इतिहास ऐकायला मिळतो.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील गीत

शाहू छत्रपती महाराज केला तलावाचा आधार||

होरे नाव ठेवील हो

हो नाव ठेविला गा,

ठेविले लक्ष्मी तळे या राधानगरी जवळा||

होरे हत्तीमहाले हो,

हो हत्तीमहाले गा,

हत्तीमहाले समोर भोगावती वाहे निरंतर||

होरे धाकटे महाराज हो,

हो धाकटे महाराज गा,

महाराज कागलकरी,

धाकटे महाराज कागलकरी,

त्यांची असावी नजर नगरीवरी||

हे सादरीकरण करत मिरवणूक मंदिरात पोहोचते. तेथील मांडावर (मंदिरातील विशिष्‍ट जागा) सर्वांच्या सुखासाठी गाऱ्हाणी घातली जातात. त्यानंतर सोंगे खेळवली जातात. त्यामध्ये निसर्ग, पौराणिक कथातील संदर्भ देतात. राजर्षी शाहू महाराजांनी सर्व समाज एकत्र यावा म्हणून सुरू केलेला लोकोत्सव आजही राधानगरीकर आत्मियतेने साजरा करतात.

पिढ्यान्‌पिढ्या ही परंपरा जोपासत आलो आहे. राजर्षी शाहू महाराजांनी हे गाव वसवून उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. गावातील प्रत्येक सण, उत्सवात प्रत्येकाला मानाचे स्थान दिले. त्यांनी दिलेला हा मान आणि ठेवा आम्ही नेहमी जोपासू. ज्या राजांनी भाकरी दिली त्यांच्याबद्दलचे प्रेम आम्ही गीतातून सादर करतो.

-कृष्णात साळवी, कलाकार, माजी सरपंच, पडळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.