करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती दर्शनासाठी कोल्हापूर-तिरुपती ही थेट विमानसेवा असल्याने मोठा प्रतिसाद मिळतो.
उजळाईवाडी : येथील विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सकडून (Indigo Airlines) सध्या नियमित सुरू असलेली कोल्हापूर-तिरुपती या थेट विमानसेवा (Kolhapur-Tirupati Airline) १५ डिसेंबरपासून बंद होणार आहे. त्यानंतर ही सेवा व्हाया हैदराबाद अशी होणार असल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा तीन तास पाच मिनिटे जादा वेळ तसेच सव्वा दोन हजारांहून अधिक तिकीट दराचा फटका बसणार आहे.
याबाबतची माहिती इंडिगो कंपनीने संकेतस्थळावरून दिली आहे. भाविकांचा प्रवास सुखकर, वेळेचे बचत व्हावी, या हेतूने कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. बारा मे २०१९ रोजी इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केली. सुरुवातीपासून या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला. कोरोनाच्या काळातही सेवा राहिली. त्यानंतर एक मे २०२१ पासून पुन्हा या सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही सेवा अखंडित सुरू होती. त्याला प्रतिसादही चांगला आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती दर्शनासाठी कोल्हापूर-तिरुपती ही थेट विमानसेवा असल्याने मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, ती बंद होत असल्याने आता भाविक प्रवाशांना कोल्हापूरहून थेट तिरुपतीला जाता येणार नाही. नव्या सेवेनुसार तिरुपतीला जायचे असेल तर व्हाया हैदराबाद जावे लागणार आहे.
पंधरा डिसेंबरपासून सेवा बंद होत असल्याने संकेतस्थळावर १४ डिसेंबरपर्यंतच थेट विमानसेवेची माहिती मिळते. त्यामध्ये सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी विमान तिरुपतीला जाण्यासाठी उड्डाण करेल. त्यानंतर ते दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी तिरुपतीला पोहचेल. या नॉनस्टॉप फ्लाईटसाठी १ तास दहा मिनिटांचा कालावधी लागेल. त्या दिवशीचा तिकीट दर ४ हजार २४१ रुपये असेल.
नव्या सेवेनुसार कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारे विमान दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण करेल. त्यानंतर ते हैदराबादला जाईल. तेथून सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी ते तिरुपतीला पोहचणार आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाची कोल्हापूर विमानतळ प्रशासनाला कोणत्याही प्रकारे माहिती दिली नसून आम्ही कंपनीला थेट सेवेबाबतचे पत्र पाठविणार असल्याचे विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.
कोल्हापूर -तिरुपती थेट विमान सेवा रद्द करण्याच्या निर्णयामुळे पर्यटक व प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे इंडिगो कंपनीने या निर्णयावर फेरविचार करून ही सेवा पूर्ववत सुरू करावी. केंद्रीय विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याप्रश्नी लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.