कोल्हापूर : शुक्रवारी दुपारनंतर हे एकत्र येतात, फोनाफोनी करतात, एक गाडी येते आणि या सर्वांना घेऊन गोव्याकडे निघते.
रात्री दहापर्यंत गोव्यात आणि तेथून समुद्रातील छोट्या बोटीवर ते पोहोचतात. "या कोल्हापुरी भावांनो' म्हणून त्यांचे स्वागत होते.
बोट सजलेली असते. ऑर्केस्ट्राने चांगला चाल धरलेला असतो. प्रत्येक टेबलवर जुगार रंगलेला असतो. जुगाराच्या चक्रांनी वेग घेतलेला असतो. या दहा-बारा जणांच्या भाषेत जुगार चांगलाच "पेटलेला' असतो. हे देखील खेळायला बसतात. रात्र चढत जाते. मद्य आणि जुगाराचीही नशा वाढत जाते आणि कोल्हापुरातून गेलेल्या या बहुतेकांच्या खिशाचे लिमिट बघता बघता संपून जाते; पण जुगाराची खरी रंगत येथूनच पुढे वाढत जाते. खिशातले पैसे संपले असले तरीही त्यांना जुगार खेळायला जाग्यावर पैसे देण्याची सोय असते; पण या पैशाची हमी कोण देणार? या प्रश्नाची तेथे चिंता करण्याचे कारण नसते. कोल्हापुरातील काही जणांना फक्त एक फोन केला की, त्यांच्याकडून हवालाद्वारे रक्कम जागेवर मिळते. अर्थात त्याला दहा-पंधरा टक्के व्याज असते; पण जुगाराची नशा चढलेल्याला त्याचे कसलेही भान नसते. तो व्याजाने पैसे घेतो. शुक्रवारची रात्र, शनिवारची रात्र बोटीवरच जुगारात घालवतो. अर्थात जुगाराच्या अलिखित नियमानुसार त्याचा खिसा रिकामा झालेला असतो; पण जुगारचालक या सर्वांना परत एका गाडीतून कोल्हापूरला नेऊन सोडतो आणि त्यानंतरच या जुगाराचा फास खऱ्या अर्थाने आवळायला सुरू होतो. गोव्यात जुगार खेळण्यासाठी ज्यांनी व्याजाने पैसे पुरवले त्याच्या वसुली पथकाचा फेरा सुरू होतो आणि हातातले घड्याळ, मोबाईल, चेन, मोटारसायकल विकून तो पैसा इथल्या सावकाराला द्यावाच लागतो. पैसा नाही दिला तर हाग्या दम दिला जातो आणि जुगारातले पैसे फेडण्यासाठी अनेकांच्या घराला उद्ध्वस्त होण्याचा शापच मिळतो.
हे पण वाचा -महाराष्ट्रातील नेते म्हणजे भुंकणारी कुत्री
कोल्हापुरात आजच्या घडीला असे उद्ध्वस्त झालेले असंख्य तरुण आहेत. ते तर उद्ध्वस्त आहेतच; पण त्यांचे कुटुंबीयही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका विशिष्ट व्यापार पेठेतले बहुतेक तरुण या गोव्याच्या जुगारात गुरफटले आहेत. जरूर तिथल्या जुगाराला परवाना आहे. सरकारमान्यता आहे. तेथे खेळायला जायचे की, नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण कोल्हापुरातील तरुणांना हा जुगार खेळण्यासाठी कोल्हापुरातच काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने आमिषे दाखवत आहेत. जुगार खेळण्यासाठी पैसा नसेल तर व्याजाने पैसा पुरविण्याचा धंदा प्रतिष्ठेने करत आहेत. चांगल्या घरातल्या पोरांना गोव्याला मोफत न्यायचे, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करायची, भावा, भावा म्हणून त्याला फुलवायचे, व्याजाने पैसे द्यायचे आणि जुगारात दोन रात्री त्यांना सलग गुंतवायचे, हा त्यांचा धंदा आहे. या जुगारातही पोरं, त्यांचा परिवार कफल्लक होत आहे आणि त्यांना जुगाराचा नाद लावणाऱ्यांची मात्र रोज चांदी होत आहे.
हे पण वाचा - ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ
जुगाराची कीड आपल्याही दारापर्यंत?
कोल्हापूरच्या तरुणाईला लागलेली ही मोठी कीड आहे. ही कीड लावणारे ठराविक आहेत. ते कोल्हापुरात उजळ माथ्याने फिरणारे आहेत. ही कीड आत्ताच घालवण्याची गरज आहे. कारण आज एका विशिष्ट व्यापार पेठेत फिरणारा हा जुगार आपल्याही मुलांच्या जवळ येऊन कधी भिडेल, हे सांगता न येण्यासारखी परिस्थिती आहे.
|