सोमवारी कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे (Kolhapur, Ichalkaranji Municipality) तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याने, ती रद्द करून मंगळवारी पाहणी करण्यात आली.
कोल्हापूर : शहराच्या हद्दीतील नऊ विविध नाल्यांमधून काळे, फेसाळलेले, मैला तसेच रक्तमिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण (Panchganga River Pollution) वाढत चालले आहे. त्यात जयंती, दुधाळीबरोबरच इतर सात नाल्यांचा समावेश आहे. त्यातून दररोज ४२.५ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळत असल्याचे मंगळवारी झालेल्या संयुक्त पाहणीत आढळून आले.
पंचगंगा प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या विविध दाव्यानंतर उच्च न्यायालयाने (High Court) प्रदूषण रोखण्यासाठी निर्देश दिले होते. तसेच त्या निर्देशांच्या पालन करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी देखरेख समिती नेमली होती. तिला साडेनऊ वर्षे पूर्ण झाली असून, प्रदूषणाची स्थिती जाणून घेण्याची गरज आहे. त्यासाठी याचिकाकर्ते प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी संयुक्त पाहणीची मागणी केली होती.
सोमवारी कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे (Kolhapur, Ichalkaranji Municipality) तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याने, ती रद्द करून मंगळवारी पाहणी करण्यात आली. शहर परिसरातील पाहणीसाठी देसाई यांच्याबरोबरच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, महापालिकेचे उपायुक्त पंडित पाटील, करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव उपस्थित होते.
दुपारी दोन वाजेपर्यंत केलेल्या पाहणीत जयंती नाल्यातून कचऱ्यासह सांडपाणी ओसंडून वाहत होते. तेथील तीन उपसा पंप सुरू असून, नाला वाहत होता. त्याच्या पलीकडे असलेल्या खानविलकर पेट्रोल पंपाजवळील, विश्वकर्मा सोसायटीच्या मागील, सिद्धार्थनगर व सीपीआरजवळ सांडपाणी जयंती नाल्यात मिसळून थेट पंचगंगा नदीमध्ये जात असल्याचे दिसून आले. हे मिसळणारे सांडपाणी काळेकुट्ट, फेसाळलेले, मैलामिश्रित, रक्तमिश्रित असल्याचे देसाई यांनी दाखवून दिले. त्यानंतर राजहंस प्रेसजवळील व कसबा बावडा येथील छत्रपती कॉलनीतील नाला नदीत मिसळत होता. बापट कॅंप नाल्यावर उपसा केंद्र असून, तिथूनही सांडपाणी वाहून नदीत जात होते.
दुधाळी नाल्याच्या पाहणीतही नाला ओसंडून नदीत मिसळत होता. या सर्वांमधून प्लास्टिक कचरा वाहून जात होता. काही ठिकाणी काढला जात असला तरी तो काठावरच असल्याचे पाहणीत दिसून आले. या नाल्यांबरोबरच पुलाची शिरोलीच्या पुलापर्यंत पाहणी केल्यानंतर दोन ते तीन किलोमीटर अंतरात संपूर्ण पात्रात केंदाळ आढळून आले. शहराच्या हद्दीतून १४९ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यापैकी १०६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था महापालिकेकडे आहे. उर्वरित ४२.५ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळत असल्याची नोंद पाहणी अहवालात केली आहे.
इचलकरंजी : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचलकरंजीतील काळ्या ओढ्याचीही आज सायंकाळी प्रजासत्ताक सामाजिक संस्था व प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त पाहणी केली. काळ्या ओढ्यासह दोन ठिकाणचे पाण्याने नमुने घेतले. या ओढ्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या, पण सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत. तिथे पाणी निर्जंतुकीकरणासाठी बंधारा बांधला आहे. त्याची पाहणी करून बंधाऱ्यातील सांडपाण्याचे नमुने घेतले. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. यावेळी देसाई यांच्याबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते संतोष हत्तीकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.