कोल्हापूर : गाव असो किंवा शहर; वाढदिवसाला मोठमोठे डिजिटल फलक लावले जातात. पण ही मंडळी आपला वाढदिवस कधी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसोबत तर कधी निराधारांसोबत साजरा करतात. आता तर त्यांनी एक अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही जवानाचा विवाह असेल तर ही मंडळी तेथे जातात आणि त्यांच्या विवाहाच्या फोटोंचा अल्बम मोफत तयार करून देतात. स्मिता कुंभार आणि अतुल भालबर अशी हा उपक्रम राबवणाऱ्यांची नावं आहेत.
प्रत्येक वर्षी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप, निराधार नागरिकांना मदत, प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या भिंती रंगवणे, असे उपक्रम आजवर या दोघांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राबवले. आपल्याला प्रत्यक्ष देशाच्या सीमेवर जाऊन देशसेवा करता येत नाही. पण, या जवानांप्रति आपणही वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करावी, हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि ही संकल्पना पुढे आली. कमर्शिअल डिझाईन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, वॉल पेटिंग हा त्यांचा व्यवसाय. हा उपक्रम जिल्हा मर्यादित असला तरीही सोशल मीडियावरील पोस्ट पाहून राज्यातील अनेक जवानांनी या दोघांना संपर्क केला आहे. गेल्या वर्षभरापासून दहा ते बारा जवानांच्या लग्नाची फोटोग्राफी त्यांनी मोफत केली आहे. दरम्यान, या दोघांचेही ‘गावगाडा’ छायाचित्र प्रदर्शन सध्या शाहू स्मारक भवनात सुरू आहे.
हेही वाचा - दो फूल एक माली आणि प्रेमकहाणी
"दोघांच्याही वाढदिवसाला आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत आलो आहोत. देशसेवा करणाऱ्या जवानांसाठी काहीतरी करावे, म्हणून अल्बम मोफत उपक्रम सुरू केला. त्याला प्रतिसादही चांगला आहे. आमच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही अल्बमसाठी खर्च करतो आणि तो जवानांना सुपूर्द करतो."
- स्मिता कुंभार, अतुल भालबर
"आम्ही देशाची सेवा करतो. पण, स्मिता कुंभार आणि अतुल भालबर यांनी सुरू केलेला उपक्रम वेगळा आहे. त्यांची फोटोग्राफीही चांगली आहेच. पण, त्यांच्या उपक्रमाचा उद्देश उदात्त आहे."
- अक्षय पाटील, नौदल जवान, सैनिक टाकळी, सध्या कारवार
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.