संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा
Adulterated Milk : आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व फार मोठे आहे. मात्र, भेसळखोरांकडून महाराष्ट्रात युरिया, डिटर्जंट पावडर, व्हाईट वॉलपेंट अशा रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत आहे. दूध आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
सणासुदीच्या काळात दुधापासून बनविलेल्या पदार्थांना अधिक मागणी असते. त्यात पनीर, खवा, दही, तूप, आदींचा समावेश आहे. त्यामुळे दुधाला मागणी अधिक आहे. मात्र, वाढते शहरीकरण आणि म्हैस, गायी व इतर दुधाळ प्राण्यांचे पालन करणाऱ्यांच्या घटत असलेल्या संख्येमुळे मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन होत नाही. पण, तरीही या पदार्थांचे उत्पादन होतच आहे.
त्यामुळे निश्चितपणे भेसळयुक्त दूध आणि त्यापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ बाजारपेठेत येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नवनवीन मार्गांनी भेसळ केली जात आहे. त्यावर तक्रार झाल्यानंतर तेवढीच कारवाईची मोहीम होते आणि पुन्हा भेसळखोर मोकाट होतात. त्यामुळे चार पैशांसाठी अनेक आबालवृद्धांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सर्वात मोठा धोका कर्करोग होण्याचा आहे. त्याशिवाय हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, अपचन, पोटदुखीही होते, असे डॉ. विजय नागावकर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध दूध आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. (Adulterated Milk might cause Cancer)
भेसळ करणाऱ्यांकडून पूर्वी खव्यामध्ये दूध पावडर टाकून त्याची विक्री कोल्हापूर जिल्ह्यात केली जात होती. मात्र, आता त्यांच्याकडून खव्या या नावाऐवजी रबडी, सुकी रबडी अशी फॅन्सी नावे देवून विक्री करतात. या स्वरूपातील पळवाटेमुळे ते नियमानुसार पाहता खव्याच्या प्रकारात मोडत नाहीत. त्याचा परिणाम ते कारवाईच्या कक्षेत येत नाहीत.
केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने सन २०२०-२०२१ दरम्यान एक सूचना जारी केली होती. त्यात प्रत्येक स्वीटमार्टधारकाने त्याच्या दुकानातील प्रत्येक दुग्धजन्य पदार्थ तयार केल्याची आणि त्याची मुदत संपल्याची तारीख लिहिण्यास सांगितले होते. त्यानुसार कारवाई सुरू केली होती. मात्र, आता ही सूचना या प्राधिकरणाने रद्द केली आहे. त्यामुळे दूध, पदार्थांचा दर्जा आणि शुद्धतेची नागरिकांनी स्वतःच खात्री करणे आवश्यक आहे.
राज्यात १४ कोटी लिटर दूधाचे उत्पादन होते. पण, ६४ कोटी लिटर दुधाची गरज आहे. म्हणजेच ५० कोटी लिटर दूध भेसळयुक्त असल्याचे दिसून येते. अशा भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आमदार बच्चू कडू यांनी सात ऑगस्ट २०२३ रोजी केली होती. त्यावर राज्य सरकारने जिल्हास्तरीय समित्या गठीत केल्या. पण, भेसळयुक्त दुधाचा पुरवठा अद्याप थांबलेला नाही. गणेशोत्सव, दसरा-दिवाळी अशा सणासुदीच्या तोंडावर भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थांचा विषय पुढे येतो. काहीठिकाणी कारवाई होते आणि सर्व काही थंड होते. या कारवाई सातत्य राहिल्याशिवाय भेसळखोरी थांबणार नाही. (Adulterated Milk in Maharashtra)
सर्वप्रथम दुधात पाणी मिसळून चरबी (फॅट) काढून घेतली जाते.
दूध अधिक शुभ्र आणि घट्ट होण्यासाठी त्यात युरिया, डिटर्जंट पावडर, स्टार्च, शाम्पू, ग्लुकोज, फॅब्रिक कलर, वनस्पती तूप मिसळले जाते.
भेसळ लॅक्टोमीटरच्या माध्यमातूनही ओळखता येत नाही.
दुधात भेसळ करण्यासाठी त्यात पहिल्यांदा सिंथेटिक केमिकल्स टाकली जातात. त्यानंतर त्यात रिफाईंड तेल, पाणी घातले जाते.
शाम्पू, रिफाईंड तेलात दूध घातले जाते. त्यानंतर साखरेची पावडर, पाणी टाकण्यात येते.
खवा आणि पनीरमध्ये स्टार्च मिसळले जाते. शुद्ध तूप अथवा लोण्यामध्ये वनस्पती तुपाची भेसळ करण्यात येते.
शिजलेला बटाटा,रताळ्याचा गर मिसळून भेसळ करतात.
रबडीमध्ये ब्लॉटिंग पेपरची भेसळ केली जाते.
दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, कॉटेज चीजमध्ये कोल्टार डाय मिसळतात.
दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी याची माहिती शिवाजी विद्यापीठातील औद्योगिक रसायनशास्त्रमधील डेअरी इंडस्ट्रीज विषय शिकविणारे प्राध्यापक डॉ. राहुल माने यांनी दिली. (How to detect Adulterated Milk)
कपभर दूध घ्या आणि ते घट्ट होईपर्यंत उकळा. त्यात तेलकट अवशेष राहिल्यास त्याचा दर्जा चांगला आणि खडबडीत अवशेष राहिले तर ते भेसळयुक्त दूध असते.
भेसळयुक्त दूध बोटांवर घेऊन घासल्यानंतर ते साबणासारखे वाटते. त्याला फेसदेखील येतो. ते बेचव असते.
कपभर दूध घ्या आणि त्यात तितकीच सोयाबीन पावडर अथवा ब्रोमोथायमॉल औषध घालून ते चांगले एकत्रित करा. त्यात लिटमस पेपर एक मिनिट ठेवा. लाल रंगाचा लिटमस पेपर निळा झाला, तर त्यामध्ये युरिया असतो.
दोन चमचे हायड्रोक्लोरिक अॅसिड, एक चमचा साखर आणि तितकेच दूध एकत्रित करा. त्या सर्व मिश्रणाला लाल रंग आला, तर ते भेसळयुक्त दूध असते.
दहा मिलिग्रॅम दूध घेऊन त्यामध्ये चार चमचे आयोडिनयुक्त
मीठ घाला. ते मिश्रण निळे झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ असल्याचे समजावे.
दुधाचे थोडे थेंब पॉलिश असलेल्या फरशीवर टाकल्यानंतर जर त्याचे डाग राहिले नाहीत, तर त्यामध्ये भेसळ असते. चांगल्या दुधाचे थेंब फरशीवर ओघळतात, त्याचे डाग पडतात.
चांगल्या दुधापासून बनविलेला खवा मऊ, तर भेसळ असलेल्या दुधाचा खवा कठीण-कडक असतो. थोडा खवा अथवा पनीर घेऊन ते पाण्यामध्ये उकळावे. ते थंड झाल्यानंतर त्यामध्ये आयोडिन टाकावे. त्यानंतर त्याला निळा रंग आल्यास त्यात स्टार्च मिसळलेले असते.
एक चमचाभर गरम केलेले तूप अथवा लोण्यामध्ये तितकेच हायड्रोक्लोरिक अॅसिड, थोडीशी साखर घालून ते एकत्रित करून घ्या. त्याच्या तळात नारंगी थर जमा झाल्यास त्यात भेसळ असते. पनीर कुस्कुरून बघा, जर ते तुटून बारीक झाल्यास ते बनावट असते.
दोन चमचे रबडीमध्ये प्रत्येकी सहा मि.लि. हायड्रोक्लोरिक अॅसिड, डिस्टिल्ड वॉटर घालावे. ते एकत्रित करताना तंतू दिसून आल्यास ती रबडी भेसळयुक्त असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.