विधानपरिषदेच्या एकेका मतासाठी उमदेवारांची यंत्रणा कामाला लागली आहे.
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील तर भाजप आघाडीकडून माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर दोन्हीही उमेदवारांनी विजयाची दावेदारी केली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ४१६ मतदार असून विजयासाठी २०९ मतांची गरज आहे. ही जादुई फिगर गाठण्यासाठी दोन्ही उमेदवारांचा कस लागणार आहे. महाविकास आघाडीने २५३ तर भाजप आघाडीने २६४ मतांचा दावा केल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषदेच्या एकेका मतासाठी उमदेवारांची यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय पक्षांपेक्षा गटातटांनी महत्व अबाधित ठेवले आहे. त्यामुळेच या गटातटांच्या सदस्यांचा भाव वाढला आहे. यातील एकेक मतदाराशी विविध मार्गातून संपर्क साधत पाठिंबा घेण्यासाठी दोन्ही उमेदवार प्रयत्न करत आहेत. एकेका मतदाराकडे सात ते आठ लोक पाठपुरावा करत आहेत. मतदारांचे पै,पाहुणे, नातेवाईक यांच्याशी संपर्क साधला जात आहे. मात्र मतदारही हुशार असल्याने गाठीभेटी घेण्यास टाळाटाळ करत आहेत. जेवढा विलंब जास्त तेवढा भाव जास्त हा आजपर्यंतचा विधानपरिषद निवडणुकीचा इतिहास आहे.
भेटीगाठी, सहली
जी मते निश्चित केली आहेत, ती सहलीवर पाठवली जात आहेत. महाविकास आघाडीच्या मतदारांना यावेळी राज्याबाहेर न नेता राज्यातच सहलीसाठी पाठवले जात आहे. दररोज दोन, चार सदस्य समाधानाने सहकुटुंब सहलीवर जात आहेत. भाजपची उमेदवारी निश्चिती व यंत्रणा सक्रीय होण्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांना सहलीवर पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून सध्यातरी सदस्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. मात्र भेटीगाठीने सदस्यांचे मात्र समाधान होताना दिसत नाही.
सतेज पाटील
जमा बाजू
- महाविकास आघाडीची ताकद
- जिल्हाा परिषदेत मोठे संख्याबळ
- पालकमंत्री या नात्याने विरोधकांना केलेली मदत
- जिल्ह्यात नेटवर्क राबवण्यासाठी नेत्यांची फौज
कमकवूत बाजू
- नवीन नगरपालिकांमधील भाजपचे संख्याबळ
- आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे भाजपसोबत
- महाडिकांच्या घरातील उमेदवारीने चुरस
- निधी वाटप, स्थावनिक निवडणुकांमुळे दुखावलेले नेते
अमल महाडिक
जमा बाजू
- नगरपालिका, नगरपंचायतमधील भाजपचे मतदान
- महाडिक कुटुंबाचे आणि गटाचे जिल्हा भरातील नेटवर्क
- पालकमंत्र्यांवर नाराज गटाचा व स्थानिक आघाड्यांचा पाठिंबा
- आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांचे बळ
कमकवूत बाजू
- निवडणुकीसाठी ऐनवेळी केलेली तयारी
- महाविकास आघाडीसारखी नेत्यांच्या फळीचा अभाव
- जिल्हा परिषदेमधील सदस्यांची नाराजी
- मित्र पक्षांवरच मोठी भिस्ती
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.