आंबा : कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास तीन महिने पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचे हॉटस्पॉट असलेल्या आंबा गिरीस्थानात दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
आंबा, मानोली व तळवडे परिसरात 60 हून अधिक लहान-मोठी हॉटेल्स व रिसॉर्टस् आहेत. पर्यटनबंदीमुळे त्यांचे आजअखेर पाऊण कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. येथे काम करणाऱ्या सुमारे दीड हजार कामगारांचा तीन महिन्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल व रिसॉर्ट उभारणीसाठी व पर्यटकांना जंगल सफारीची सेवा देण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांसाठी काहींनी बॅंकांची कर्जे काढली आहेत. त्याचेही हप्ते थकलेले आहेत. जंगल सफारीच्या माध्यमातून मिळणारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उसनवारी करून त्यांना घरप्रपंच चालवावा लागत आहे. आता पावसाळ्याचे संकट त्यांच्यासमोर उभे आहे.
हॉटेल्समधून खाद्यपदार्थ पार्सलद्वारे देण्यासाठी ग्राहक नाहीत. जिल्हाबंदी असल्यामुळे दूरवरचे पर्यटक येऊ शकत नाहीत. मुंबई, पुणे व अन्य भागांतून आलेल्यांना येथील नऊ रिसॉर्टमध्ये इन्स्टीट्युशनल क्वारंटाइन केले असल्याने लोकांच्या मनात वेगळीच धास्ती आहे. स्थानिक गिऱ्हाईक सोडले तर पर्यटकांअभावी येथील बाजारपेठेत शुकशुकाट आहे.
पर्यटनबंदीमुळे येथे पर्यटक नाहीत. व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारी व उसनवारी सुरू आहे. पावसाळ्यात कुटुंब कसे चालवायचे हा गंभीर प्रश्न आहे. पर्यटन सुरू केल्यास हळूहळू आर्थिक स्थैर्य मिळेल. शासनाने पर्यटनबंदी लवकर उठवावी.
- संतोष बागम, उपाध्यक्ष, मानोली इको टुरिझम, आंबा
दृष्टिक्षेप
- आंबा परिसरात तीन महिने पर्यटन बंद
- 60 वर लहान-मोठ्या हॉटेल्स, रिसॉर्टस्ना फटका
- दीड हजार कामगारांचा रोजगार बुडाला
- हॉटेलमध्ये पार्सललाही ग्राहक नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.